अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याची कार्यवाही तातडीने राबवा
सार्वमत

अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याची कार्यवाही तातडीने राबवा

स्नेहलता कोल्हे यांची मागणी

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला घर या योजनेचा लाभ कोपरगाववासियांना मिळाला पाहिजे. म्हणून जुलै 2019 मध्ये बैठक घेऊन शहरातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे अधिकार्‍यांच्या बैठकीत ठरले होते.

परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नसल्याने त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून शहरातील अतिक्रमित घरे लवकरात लवकर नियमानुकूल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

प्रधानमंत्री आवास येजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला घर या योजनेचा लाभ कोपरगाव वासीयांना मिळाला पाहिजे म्हणून सौ कोल्हे यांनी जुलै 2019 मध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, भुमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत नागरिकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये शहरातील हनुमान नगर, इंदिरा नगर, दत्तनगर, महादेव नगर, गोरोबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधी नगर, टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर, लक्ष्मी नगर, साई नगर, येवला रोड, खडकी, जिजामाता उद्यान, दत्तपार, टाकळी नाक्यामागील व बेट अशा 20 ठिकाणी 5 हजार 561 अतिक्रमीत घरे असून येथील रहिवाश्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न असल्याचे सौ. कोल्हे यांनी सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2011 पर्यंतची अतिक्रमीत रहिवाश्यांना दिलासा देण्यासाठी सुधारित शासन निर्णयही काढून अशी घरे नियमानुकूल करण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

त्यासंदर्भात शासकीय जागेवर अतिक्रमण करून रहिवास करणार्‍यांचे लवकरात लवकर सर्व्हेक्षण करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता. यावेळी प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर येथील अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदरचा प्रस्ताव संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग पुणे यांच्या कार्यालयाकडे असून यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. परंतु सदरची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही होऊन कोपरगाव शहरवासीयांची अतिक्रमीत घरे नियमानुकूल करण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com