अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या - स्नेहलता कोल्हे

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सातत्याने विविध संकटांना तोंड देत असतांना काल झालेल्या वादळी वारा व अतिवृष्टीने पुन्हा शेतकर्‍यांना मोठा तडाखा बसला आहे.

यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झालेले आहे. शासनाने तातडीने या शेतकर्‍यांना नुकसानीची सरसकट भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीत म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह अतिवृष्टी झाली. काढणीसाठी आलेले सोयाबीन, मका, ऊस व इतर अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. उभी पिके पूर्णपणे शेतात आडवी झाली.

त्यामुळे शेतकर्‍यांवर वारंवार येणार्‍या संकटात आणखी भर पडली आहे. यावर्षीचा संपूर्ण हंगामच शेतकर्‍यांच्यादृष्टीने नुकसानीचा ठरला आहे. सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी विवंचेनत सापडला आहे. या कठीण काळात आर्थीक परिस्थिती नसतानाही पिके उभी केली होती. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे राहिलेली पिकेही जमीनदोस्त झाली.

त्यामुळे शेतकर्‍यांचे स्वप्नच धुळीला मिळाले आहे. शेतकरी हतबल झालेला आहे. हाती काहीही राहिले नसल्याने आज जगाचा पोशिंदा आभाळाकडे नजर लावून बसला आहे. या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com