वंचित शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरीत करा

स्नेहलता कोल्हे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
वंचित शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरीत करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तांत्रिक अडचणीमुळे अन्न धान्यापासून वंचित राहिलेल्या कोपरगाव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना तातडीने धान्य वितरीत करावे,

अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.

मार्च 2021 मध्ये तालुक्यातील रेशन दुकानामध्ये आलेले धान्य वाटपास विलंब झाला. मार्च महिन्यात गहू, तांदूळाबरोबर मका वाटप करण्यात आले, परंतु ई पॉस मशीनवर मका धान्य वितरण करण्यास अडचणी आल्याने संपुर्ण महिनाभर नागरिकांना धान्याचे वाटप झाले नाही. तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले हे वितरण 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये वाटण्यास सुरूवात केली, परंतु केवळ 5 दिवस सुरू राहिलेल्या या वाटप मोहिमेत सर्वच नागरीक धान्य घेवू शकले नाही.

सध्या देशासह राज्यभरात कोरोना महामारीचे संकट पुन्हा वाढले आहे. कोपरगाव तालुक्यातही रूग्णसंख्या वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी दुपटीने शासनाने नुकतेच निर्बंध लागू केलेले आहे. या परिस्थितीमध्ये हातावर पोट असलेल्या कुटूंबाची दयनीय अवस्था झालेली आहे. हाताला काम नसल्यामुळे दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनेक कुटूंबांना भेडसावत आहे.

त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटूंबाची कुचंबणा होत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण झालेले नाही, त्या नागरीकांना तातडीने धान्य वितरण करण्यात यावे, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com