
टाकळीमिया (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे एक नाग गायीच्या गोठ्यात शिरला. तेथे असलेल्या शेळीच्या दोन बकरांना त्याने दंश केला. त्यानंतर सापाने चक्क शेळीच्या बकराला गिळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला.
टाकळीमिया येथील सोनवणे वस्तीवर बाळासाहेब तोडमल यांच्या जनावरांच्या गोठ्यात एक नाग शिरला. नागाने तेथे असलेल्या शेळीच्या 2 बकरांना दंश केला. काही वेळातच दोन्हीही बकरे दगावली.
तोडमल हे गोठ्यात कामानिमित्त आले असता नाग शेळीच्या एका बकराला गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र मोरे यांना घटनेची माहिती दिली. मोरे यांनी राहुरी येथील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना बोलावून घेतले.
काही वेळात सर्पमित्र कृष्णा पोपळघट, सर्पमित्र मुजीब देशमुख व रोहित जगधने हे घटनास्थळी हजर झाले. पोपळघट यांनी नागाला पकडून ताब्यात घेतले आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली.