
राजुरी |वार्ताहर| Rajuri
ऊस तोड कामगारांची मुलेही आपले आई वडिल जे काम करतात त्याच कामाची प्रत्यक्षात खेळण्याच्या साहित्यातून अंमलबजावणी करून भातुकलीच्या खेळ केला. आपल्याकडील ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्या उसाने भरून ऊस तोडणी व गाड्या भरण्याचे प्रात्याक्षिक हूबेहूब तयार केले. सदरचे प्रात्याक्षिक चिमुकल्या मुलांनी खेळ खेळत प्रवरानगर येथील ऊस तोडणी मजुरांच्या अड्ड्यावर तयार केले.
आपण आजवर समाजामध्ये होत असणार्या घडामोडींमध्ये पाहिले आहे की, राजकारणी व्यक्तीची मुलेही राजकारणात येतात, शिक्षकाचीही मुले शिक्षक होतात, डॉक्टरची मुले डॉक्टर होतात, सिव्हिल इंजिनिअरची मुले सिव्हिल इंजिनिअर होतात. अशा एक ना अनेक व्यक्तींची मुले-मुली ज्या त्या क्षेत्रात आपापल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या युगात काम करताना दिसत आहेत.
त्याच धर्तीवर ऊस तोडणी मजुरांची मुले व मुली ही लहानपणी खेळ खेळताना आपल्याकडे असणार्या खेळाचे साहित्य ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी अशा स्वरूपाच्या खेळण्यांतून आपल्या आई वडील ऊस तोडणी मजुरांची भूमिका निभावत असतानाचे प्रात्यक्षिकच जणूकाही ही चिमुरडी मुले घेत आहेत. असे चिमुकल्यांचे भातुकलीचे खेळ पाहून अनेक व्यक्तींना व नागरिकांना आश्चर्य वाटू लागले.
सध्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू होऊन यशस्वीपणे ऊस तोडी सुरू आहे. अनेक कारखान्यांवर ऊस तोडणी मजुरांच्या अड्ड्यावर मुले आपल्या पारंपरिक ऊस तोडणी करून त्यामध्ये ऊस भरणे करत असतानाचे खेळ खेळत असतात. प्रवरानगर येथील साखर कारखाना परिसरात असणार्या ऊस तोडणी मजुरांच्या अड्ड्यावर असणारे हे चिमुकले परमेश्वर शेळके, अनिल काळे, गोविंद बडे, चिऊ बडे, गुड्डी बडे, पिल्लू गोल्हार असे मुले सध्या असा खेळ ऊस तोड मजुरांच्या अड्ड्यावर करत असतात.
ऊस तोडणी मजुरांची मुले शाळेत जाताना दिसत नाहीत. करोनाच्या या आलेल्या संकटातून अनेक शाळा महाविद्यालय चालू बंद होत आहेत. मात्र ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण न घेता असे ऊस तोडणीचे प्रात्यक्षिक करत असल्यामुळे ही मुले भविष्यातील ऊसतोडणी मजूर होणार अशी शंका येऊ लागली.