संगमनेरातील कत्तलखाने बंद करणार - पोलीस अधीक्षक ओला

पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola)

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्याचा शोध घेऊन हे कत्तलखाने बंद करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

जिल्हा पोलीस प्रमुखाचा पदभार घेतल्यानंतर ते काल सायंकाळी प्रथमच संगमनेर शहरात आले होते. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे. जिल्ह्यामध्ये या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. संगमनेर शहरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. संगमनेर शहरात कोणत्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाने सुरू राहणार नाहीत याबाबत आपण पोलीस अधिकार्‍यांना सूचना केलेल्या आहेत.

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून चोरांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अवैध व्यवसाय या शहरांमध्ये सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन शहरातील अवैध व्यवसायिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील वाहतुकीला अडथळे येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संगमनेर शहर पोलीस ठाण्याला लवकरच नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल, असे यावेळी ते म्हणाले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सातव, प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक राकेश ओला हे संगमनेर शहरांमध्ये येणार असल्याची कुणकुण लागताच शहरातील अवैध व्यवसाय करणार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. या व्यावसायिकांनी आपापली दुकाने लगेच बंद करून टाकले. गुटखा विक्रेते आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे अचानक गायब झाले. ओला हे संगमनेर मध्ये येणार असल्याची माहिती अवैध व्यावसायिकांना समजली कशी ?याबाबत आता वेगवेगळी चर्चा सुरू आहे. अवैध व्यवसायिकांसोबत संबंध ठेवून असलेल्या काही पोलीस कर्मचार्‍यांनी या अवैध व्यवसायिकांना माहिती देऊन सावध केल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com