कत्तलखान्यासाठी घेऊन जात असलेली 27 गोवंश जनावरे चांद्यात जप्त

तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, दोघे पसार 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
कत्तलखान्यासाठी घेऊन जात असलेली 27 गोवंश जनावरे चांद्यात जप्त

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलिसांनी मंगळवारी रात्री अवैधरित्या कत्तलखान्यासाठी जनावरे घेऊन जाणार्‍यांवर मोठी कारवाई करत जनावरे व वाहने जप्त करून तिघांना अटक केली. दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.आरोपींकडून 19 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध कत्तलखाने कायमचे बंद करावेत,अशी मागणी चांदा परिसरातून होत आहे.

याबाबत सोनई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून त्यांच्या आदेशानुसार सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व अंमलदार यांनी चांदा येथे कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम हे त्यांच्याकडील आयशर टेम्पो व महिंद्रा पिकअपमध्ये गोवंशीय जनावरे भरत असताना मिळून आले. टेम्पोमध्ये सात ते आठ जनावरे व महिंद्रा पिकअपमध्ये चार जनावरे आखुड दोरखंडाने बांधलेली होती.

काही जनावरे ही वाहनांना आखूड दोरखंडाने बांधलेली व काही जनावरे ही जवळ असलेले पत्र्याचे शेडमध्ये अव्यवस्थितपणे आखूड दोरखंडाने बांधलेली मिळून आली. गोवंशीय गाई, गोर्‍हे असे दोन्ही वाहनांमध्ये खचाखच भरलेली होती. वाहनांच्या बाजूला बांधलेली काही गुरे तसेच शेडमध्ये अव्यवस्थित बांधलेली आढळून आली गाडयामध्ये भरून त्यांना क्रूरतेने आखूड दोरखंडाने बांधून चारा, पाणी, वैद्यकीय सोयी पुरेसे अन्न-पाणी यांची सोय न करता क्रूरतेने जनावरे बांधलेल्या स्थितीत आढळून आली.

घटना ठिकाणी छाप्यामध्ये 27 जनावरे त्यात गाई, गोर्‍हे विविध रंगाची व वयाची जनावरे कत्तलीसाठी गाड्यात भरत असताना आढळून आली. त्या ठिकाणी तीन इसमांना जागीच पकडण्यात आले. त्यांचे इतर साथीदार पसार झाले. पकडलेल्या इसमाच्या कब्जातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 27 गोवंशीय जनावरे तर 11 लाख रुपये किमतीचे सदर जनावरे वाहतुकीसाठी उपयोगात आणलेली वाहने त्यात एमएच 16 सीसी 8594 नंबरचा आयशर टेम्पो व एमएच 17 बीडी 112 नंबरची महिंद्रा पिकअप जीप असा एकूण 18 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला.

अजहर ताहिर शेख (वय 29) रा. कुरेशी मोहल्ला, जुनेद अब्बास शेख उर्फ कुरेशी (वय 21) रा. सुमित्रा कॉलनी, निराला बजार औरंगाबाद, भगवान विष्णू धुमाळ (वय 47) रा. चांदा अशी अटक केलेल्यांची नावे असून इर्शाद कादिर शेख (रा. चांदा), शनी पठाण (रा. चांदा) हे पसार झाले आहेत.

अटक केलेल्यापैकी जुनैद अब्बास शेख उर्फ कुरेशी रा. औरंगाबाद याचे यापुर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. चांदा येथून मुक्तता केलेल्या जनावरांना जय गोमाता सेवाभावी संस्था वृध्देश्वर मढी (ता. पाथर्डी) येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले.

सोनई पोलीस ठाण्यात हवालदार ज्ञानेश्वर गोरक्षनाथ आघाव यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 295/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण. सुधारीत अधिनियम 1995 चे कलम 5, 4 (क) सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11, मोटार वाहन कायदा कलम 192 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केलेेे असता 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार श्री. गायकवाड, दत्ता गावडे, अडकित्ते, पोलीस नाईक बाबा वाघमोडेे, पोलीस नाईक नाना तुपे, पोलीस कॉन्स्टेबल जावळे, मोरे, जवरे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात यांनीही कारवाईत भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com