
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
कत्तल करण्याच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या 8 वासारांची पोलिसांनी छापा टाकून सुटका केली. शहरातील धनगरवस्ती वार्ड क्र. 3 येथे शहर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वार्ड क्र. 3 मधील धनगरवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची 8 वासरे (गोर्हे) कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी बीट अंमलदार व तपास पथकास सदरच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस पथकाने धनगरवस्ती येथे जाऊन छापा टाकला असता तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे काळ्या, पांढर्या, तांबड्या रंगाची 8 जर्सी गोर्हे (किंमत प्रत्येकी 4 हजार रुपये) मिळून आली. शेडमध्ये त्यांची चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले होते.
याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता ती जनावरे हारूण गणी कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) याने आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हारूण कुरेशी याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 430/2023, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995चे सुधारीत कायदा सन 2015चे कलम 5, 5 (ब), 9 (अ) सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960चे कलम 11 च, ज, छ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर, उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शफिक शेख, पोलीस नाईक भैरवनाथ अडांगळे, अमोल जाधव, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, अजिनाथ आंधळे, शिवाजी बडे, संभाजी खरात यांनी ही कारवाई केली. श्री. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.