
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वाळकी (ता. नगर) येथून मालेगाव येथे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत पकडला. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षक दलाच्या (झेंडेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) पदाधिकार्यांनी ही कारवाई करून जनावरे व पिकअप कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिला.
याप्रकरणी पदाधिकारी अक्षय राजेंद्र कांचन (वय 25 रा. उरूळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश कोंडीराम कांडेकर (वय 25), नदीम मुक्तार शेख (वय 28), सोहेल उबेद पठाण (वय 18, तिघे रा. वाळकी ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरे, पिकअप असा दोन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. झेंडीगेट येथील कुरेशी याच्या मार्फत वाळकी येथून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती अक्षय कांचन यांना मिळाली होती.
त्यांनी सहकारी ऋषिकेश रामचंद्र कामठे व लोकेश अनंत साळुंके (रा. बुरूडगाव ता. नगर) यांच्या मदतीने सक्कर चौकात संशयित पिकअप पकडला. पिकअप पकडताच त्यांनी 112 नंबरवर संपर्क करून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पिकअप, जनावरे व त्यातील तिघांना ताब्यात घेतले. सदरची जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.