कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

कोतवाली पोलिसांची कारवाई || एकास अटक
कत्तलीसाठी जाणार्‍या जनावरांची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारा पिकअप कोतवाली पोलिसांनी पकडला. रविवारी रात्री झेंडीगेट भागातील डॉ. आंबेडकर चौक येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहाजी लक्ष्मण मडके (वय 32 रा. चांदा-मिरी रोड, ता. नेवासा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून दोन लाख 50 हजाराचा पिकअप, पाच वासरे, एक जर्सी गाय असा एकुण दोन लाख 80 हजार रूपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. झेंडीगेट भागातील डॉ. आंबेडकर चौक येथून रोडने एक पिकअप गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार अभय कदम, काजळे, पी.एन.इनामदार, सलीम शेख, शाहीद शेख, श्रीकांत खताडे, सुमित गवळी, दीपक कैतके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

पथकाने पंचासमक्ष डॉ. आंबेडकर चौक येथे पिकअप (एमएच 20 एटी 7258) पकडला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये पाच वासरे, एक जर्सी गाय मिळून आली. सदरचे जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबूली मडके याने दिली. पोलिसांनी जनावरांची सुटका केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com