
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोमध्ये कत्तलीसाठी चालवलेली 45 जनावरे राहुरी पोलीस पथकाने रात्रीच्या दरम्यान वांबोरी येथे सापळा लावून पकडली. सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राहुरी पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला. त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला.
पथकाने त्या टेम्पोला थांबवून तपासले असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदर जनावरे संगमनेर येथील ग्रामीण भागातून शेतकर्यांकडून विकत घेऊन अहमदनगर येथे कत्तलीसाठी चालवली आहे.
पोलीस पथकाने त्यावेळी 50 हजार रुपये किंमतीच्या 5 जर्सी गाई, 40 हजार रुपये किंमतीची 40 वासरे तसेच 5 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक गणेश लिपने यांच्या फिर्यादीवरून आरोपी महंमद रफिक उस्मान कुरेशी, वय 32 वर्षे, रा. मदिनानगर, ता. संगमनेर. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 130/2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नूसार 11 (1) (एफ), महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 नुसार 5 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.