
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कत्तलीसाठी एकत्रित क्रूरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल दहा गोवंश जनावरांची कर्जत पोलिसांनी मुक्तता केली. या प्रकरणी तीघांवर प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिम इस्माईल कुरेशी, मुजाहित शकील कुरेशी, सोहेल गफार कुरेशी (तिघेही रा.राशीन ता.कर्जत) अशीं संशयितांची नावे आहेत. एका गुप्त माहितीदाराकडून कर्जत पोलिसांंना कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
पोंलीसांनी खाजगी वाहनाने घटनास्थळी जाऊन दुपारी 3 वाजता छापा टाकला. त्यावेळी तिघा जणांनी दहा गोवंश जनावरांना चारा पाण्यापासून वंचित ठेऊन क्रूरपणे डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मिळून आलेली खिलार गोवंश जातीची अंदाजे 1 लाख 32 हजार किमतीची 10 जनावरे कत्तलीसाठीच चालविली असल्याची खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी जागीच पंचनामा करून व जनावरे जप्त केली.
ही सर्व जनावरे राशीन येथील जनजागृती प्रतिष्ठान संचालित मकामधेनूफ गोशाळेत मुक्त करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल लोखंडे, अर्जुन पोकळे यांनी ही कामगिरी केली.