कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप पेटविला

शेंडीबायपास येथील घटना || राहात्याच्या दोघांना मारहाण
कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप पेटविला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शेंडी बायपास (ता. नगर) येथे पकडला. दरम्यान गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार्‍या दोघांना गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. जनावरांची सुटका करत पिकअप पेटवून दिला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणार्‍या जावेद मुसा पठाण (वय 28) व अजमद मस्तान शहा (दोघे रा. ममदापूर ता. राहाता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा पिकअप, दोन मयत गाई, 18 मयत वासरे, तीन जीवंत जखमी झालेल्या गाई व पाच वासरे असा दोन लाख 40 हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

जावेद पठाण व अजमद शहा यांनी गोवंशीय जनावरे पिकअपमध्ये भरून ते कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी नगर येथे घेऊन येत होते. याची माहिती गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी शेंडीबायपास येथून त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना सदरचा पिकअप शेंडीबायपास जवळच पलटी झाला. त्या पिकअपमधील तब्बल 18 वासरे, दोन गाई मयत झाल्या तर तीन गाई जखमी झाल्या आहेत.

दरम्यान संतप्त झालेल्या गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरच्या पिकअपमधून गोवंशीय जनावरे बाहेर काढली. पठाण व शहा यांना मारहाण करत त्यांचा पिकअप पेटवून दिला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदरचा पिकअप व जनावरे ताब्यात घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दरम्यान पठाण व शहा यांना मारहाण केल्याप्रकरणी पठाण याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांगदेव भगत, सिध्दार्थ कराळे, भुषण भिंगारदिवे, नवनाथ भगत, बबलू उर्फ संदीप भगत, ज्ञान दाणी, अतुल कराळे, योगेश संतोष शिंदे, विकास चव्हाण व इतर चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com