खड्ड्यात पिकअप फसला अन् अकरा जनावरांना मिळाले जिवदान

पोलीसांची कारवाई
खड्ड्यात पिकअप फसला अन् अकरा जनावरांना मिळाले जिवदान

बेलापुर |प्रतिनिधी|Belapur

कत्तल करण्याच्या इराद्याने एकाच पिकअपमध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असतांना बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पिकअप फसला अन् टेम्पोतील जनावरे पाहुन नागरीकांनी पोलीसांना पाचारण केले. त्यानंतर अकरा जनावरांना जिवदान मिळाले. पोलीसांनी पिकअपसह सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन दिवसापूर्वी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करुन खड्डा बुजविण्यात आला. आज सकाळी अकरा वाजता अकरा गोवंश जातीची जनावरे भरुन महेंद्रा पिकअप एमएच 11 टी 5499 ही गाडी वळण घेत असतांना खड्ड्यात फसली. त्यावेळी टेम्पो काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले. परंतु पिकअपमधील दृश्य पाहुन नागरीकांचा संताप अनावर झाला. पिकअपमध्ये अकरा गायी दाटीवाटीने घुसविलेल्या होत्या. त्यात एक गाय मृतावस्थेत होती.

तेथे उपस्थित असलेले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, शिवप्रतिष्ठाणचे किसन ताक्टे, रोहीत शिंदे, राहुल माळवदे, प्रफुल्ल डावरे, स्वप्निल खर्डे, सागर लाहोर, स्वप्निल खैरे, भुषण चेंगेडीया यांनी काही अघटीत होण्या आगोदरच पोलीसांना ही माहीती कळविली. बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना याबाबत कळविले. त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेवरुन बेलापूर पोलीस झेंडा चौकात आले व जनावरांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.

प्रकाश पोळ (रा. मांजरी) हा अमोल विटनोर यांच्या सांगण्यावरुन या जनावरांची चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने घेवु जात असल्याची माहीती समजली. पोलीसांनी कारवाई करुन त्याच्या ताब्यातील तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेली अकरा गायी व वासरे संगमनेर येथील जिवदया गो शाळेत पाठविण्यात आली आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निखील तमनर यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारीत कायदा कलम 2015 चे कलम 5, 5(ब)(क)9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com