हस्तीदंत तस्करी करणारे ‘वीरप्पन’ महामार्गावर जेरबंद

6 जणांना अटक || 4 दिवसांची कोठडी
हस्तीदंत तस्करी करणारे ‘वीरप्पन’ महामार्गावर जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधे तयार करण्यासाठी हस्तीदंत तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली. या टोळीकडून हस्तीदंत व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश भगवान मरकड (वय 26, रा. गहिलेवस्ती, ता. शेवगाव), सचिन रमेश पन्हाळे (वय 33, रा. आखेगाव, ता. शेवगाव), निशांत उमेश पन्हाळे (वय 25, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), संकेश परशुराम नजन (वय 23, रा. पवारवस्ती, शेवगाव), यंकटेश दुरईस्वामी (वय 40, हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, नगर), महेश बाळासाहेब काटे (वय 30, रा. आखेगाव, ता. शेवगांव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे, सोपान गोरे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, भीमराज खर्से, सुरेश माळी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना 1 जुलै 22 रोजी मिळालेल्या खबरीनुसार नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर टोलनाका येथे दोनजण हस्तीदंत विक्री करण्याकरीता येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कळविली. त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सोपान गोरे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, भीमराज खर्से, सुरेश माळी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे आदींच्या पथक कारवाईसाठी रवाना केले.

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खासगी वाहनाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील, जेऊर टोलनाका येथे वेशांतर करुन सापळा लावून थांबले. थोड्याच वेळेत दोन संशयीत टोलनाका परिसरात संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यापैकी एकाचे पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती. सॅकमधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता. थोडावेळ थांबल्यानंतर संशयिताजवळ एक राखाडी रंगाची कार येऊन थांबली. या कारमधून 4 जण खाली उतरले. संशयीत दोघे कारमधून आलेल्यांना सॅकमधून एक मोठा हस्तीदंतासारखी वस्तू दाखवून बोलत असताना पोलिसांनी संशयितांना झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे हस्तीदंत मिळून आले.

संशयितांना त्याबाबत विचारपूस करता त्यांनी हस्तीदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो, अशी कबुली दिली. त्यांनी आपली नावे व्यंकटेश दुरईस्वामी (वय 40, हल्ली रा. वाकोडी फाटा, दरेवाडी, नगर), महेश बाळासाहेब काटे (वय 30, रा. आखेगाव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे हस्तीदंतबाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदार यांना काळ्या बाजारात हस्तीदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले. कारमध्ये महेश भगवान मरकड (वय 26, रा. गहिलेवस्ती, ता. शेवगाव), सचिन रमेश पन्हाळे (वय 33, रा. आखेगांव, ता. शेवगाव), निशांत उमेश पन्हाळे (वय 25, रा. भगतसिंग चौक, शेवगाव), संकेश परशुराम नजन (वय 23, रा. पवारवस्ती शेवगांव) होते.

त्यांची चौकशी केली असता व्यंकटेश दुरईस्वाती व महेश काटे यांच्याकडून हस्तीदंत खरेदी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंताचे प्राथमिक तपासणीमध्ये ते अस्सल असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधे यासाठी हस्तीदंताचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतराष्ट्रीय बाजारात विशेष महत्व आहे. हत्ती दातांची किंमत जाहीर केल्यास हत्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वन विभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातलेली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com