सलाबतपूर परिसरात आढळले आणखी 6 संक्रमित
सार्वमत

सलाबतपूर परिसरात आढळले आणखी 6 संक्रमित

दुसर्‍या दिवशीही रॅपीड टेस्ट (rapid antigen test)

Nilesh Jadhav

सलाबतपुर | वार्ताहर | Salabtpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूरमध्ये करोनाने जोरदार शिरकाव केला असून गेल्या तीन दिवसांत एकूण 24 करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

आणखी संपर्कातील व्यक्तींची तपासणी होणे बाकी असून रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलाबतपूरकरांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे. करोनाचा उद्रेक होण्यास दक्षता समिती व स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. गावातील एकाच कुटुंबातील पाच रुग्ण करोना बाधित निघाले.

त्याच कुटुंबातील एक व्यक्ती रुग्णालयात दाखल करताच मरण पावली. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला ते समजले नाही. मात्र त्या कुटुंबातील आरोग्य विभागाने इतर नातेवाईकांचे स्त्राव तपासणीसाठी नेले असता दुसर्‍या दिवशी एकाचा अहवाल करोना बाधित आला. तर काही तासांतच इतर चार नातेवाईकांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. तर एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती संक्रमित आढळून आले. याच करोना बाधितांच्या घरी पंधरा दिवसांपूर्वी लग्न सोहळा पार पडला असल्याचे समजते.

या लग्न सोहळ्यासाठी मुंबईहून काही पाहुणे चार ते पाच दिवस मुक्कामी राहून गेल्याचे समजते. सध्या मुंबईच्या बहुतांश भागात करोनाने थैमान घातले असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. अशा भागातील लोक इतके दिवस राहून गेल्याचे स्थानिक प्रशासनाला समजले नाही काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. समजले असेल तर त्यांचे विलगीकरण का केले गेले नाही. दक्षता समितीला जबाबदारीचे भान नव्हते का? काहीही असले तरी जोमात आलेल्या वरातीने गाव कोमात जाण्याची वेळ आली हे मात्र नक्की.

सोमवारी करोना बाधितांचा अकडा 21 इतका होता. तर मंगळवारी 96 जणांच्या घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये 6जण करोना बाधित सापडले. त्यात सलाबतपूर येथील तिघे तर जळके, दिघी व मंगळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एकट्या सलाबतपूर गावचा अकडा आता 24 इतका झाला आहे. जास्त करोनाबाधित असलेल्या भागातील करोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांनी आज आरोग्यविभाग व प्रशासनाने वारंवार बोलावूनही रॅपिड टेस्ट करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. तसेच दक्षता समितीच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांच्यावर कारवाई होईल काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गावात संचारबंदी लागू असून कार्यालये, बाजारपेठ बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com