अकोले |प्रतिनिधी| Akole

गेली 40 वर्षे अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी दिलेले योगदान लोक जाणून आहेत,

जनता योग्यवेळी माझ्या कामाचे मूल्यमापन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच सोशल मीडियातून आपल्यावर होत असणार्या टीका टिप्पणीकडे कार्यकर्त्यानी दुर्लक्ष करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी आपल्या समर्थक व अनुयायांना केले आहे.

गायकर यांनी नुकताच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यांच्यामवेत अगस्ति कारखाना ,अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी प्रवेश केला आहे.गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा अनेक दिवसांपासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात होती.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया मध्ये माजी आमदार वैभवराव पिचड यांचे समर्थक असणार्या काही कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.बर्याच वेळेला व्यक्तिगत टीका करताना टीकेची पातळी घसरल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना गायकर म्हणाले, गेल्या वर्ष भरापासून अशा प्रकारची टीका सुरू आहे.मी व्हाट्सअप वापरत नाही.पण माझे कार्यकर्ते कुणी काय टीका केली हे मला सांगत असतात.गेली 40 वर्ष तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी दिलेले योगदान जनता जाणून आहे.त्यामुळे या टीकेला कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याच्या फंदात पडू नये,जेंव्हा वेळ येईल तेंव्हा जनताच याला चोख उत्तर देईल व माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गायकर यांच्या राष्ट्रवादी मधील प्रवेशाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.शहरात तसेच तालुक्यात ठीकठिकाणी त्यांच्या स्वागतकाचे 5 फ्लेक्स लागले आहेत. गायकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली.त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आ. डॉ. किरण लहामटे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

स्वतः काचेच्या घरात राहणार्यांनी ...

स्वतः काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्याच्या घरावर दगडफेक करताना योग्य तो विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला.