
कोपरगाव | तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे भाऊबीजी निमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असतांना मुलाचा पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सौ. अर्चना जगदीश सोनवणे (वय 35 वर्ष) रा. वणी नाशिक व कु. राणी शरद शिंदे (वय 18 वर्ष) रा. म्हसरूळ नाशिक असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे...
भाऊबीज निमित्त कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे 3 बहिणी तसेच भाचा-भाच्या आल्या होत्या. त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून घरानजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या. अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली.
त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना मामाचा मुलगा मंगेश चव्हाण (वय 14 वर्ष) याने 3 जणांना वाचविले. मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे.
सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.