अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हातवळण (ता. नगर) शिवारात सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, एक ब्रास वाळू

असा 33 लाख 4 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. चौघांविरूद्ध भादवि 379 सह पर्यावरण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बंडू शिवाजी आजबे (वय 30), नंदकुमार देवराव आजबे (वय 40 दोघे रा. शिराळ ता. आष्टी जि. बीड), रमेश बाळासाहेब घोडके (वय 27), सागर बाळासाहेब घोडके (दोघे रा. पारोडी ता. आष्टी जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

नगर तालुक्यातील हातवळण शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोक अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक सानप यांनी आपल्या पथकातील अधिकारी व कर्मचार्यांना सोबत घेत बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिना नदीपात्रात छापा टाकला.

यावेळी जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये वाहतूक करताना चौघे पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करत जेसीबी, ट्रॅक्टर जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एस. गांगर्डे करीत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.