File Photo
File Photo

सीना, कुकडीच्या आवर्तनापासून गावे वंचित राहण्याची भीती

पाण्याचे नियोजन करण्याची आ. पवार यांची मागणी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेती सोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आ. रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून दिले आहे.

कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतू सद्यस्थितीत योग्य नियोजना अभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भोसे खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. जेणेकरुन सीना कालव्याचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडता आले असते आणि कालव्याच्या शेवटच्या गावांनाही पूर्ण दाबाने सिंचनासाठी पाणी मिळाले असते.

परंतु ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सध्या सीना कालव्यातून आवर्तन सोडलेले असतानाही ते पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे निमगांव डाकू, नवसारवाडी, पाटेवाडी, आनंदवाडी, तरडगाव ही अखेरची पाच-सहा गावे या आवर्तनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कुकडी कालव्याच्या 165 किलो मीटरला जो दाब 600 ते 650 क्यूसेक्स पाहिजे तो अजूनही 400 क्यूसेक्सच्या पुढे गेलेला नसल्याने कुकडी लाभक्षेत्रातील टेलच्या भागात सिंचनासाठी सुरवात व्हायला पाहिजे होती, ती अजूनही झाली नाही.

यामुळे शेतातील उभे पीक आणि फळबागा डोळ्यासमोर सुकत असल्याचे पाहून त्या वाचवण्यासाठी धडपड करणार्‍या शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.परिणामी कुकडी आणि सीना कालव्यावरील गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील चारा पिके आणि बहुवार्षिक पीक असलेल्या फळबाग उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com