अहमदनगर l प्रतिनिधी
सोशल मीडियावर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन समाजाच्या भावना दुखावणारी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरातील शीख, पंजाबी समाजाच्यावतीने करण्यात आली.
मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मनोज मदान, राजू मदान, अर्जुन मदान, करण धुप्पड, सतीश गंभीर, रोहित बत्रा, राजा नारंग, राहुल बजाज, सिमर वधवा, सरबजितसिंह अरोरा, पुनीत भुतानी आदी उपस्थित होते.
सिने अभिनेत्री कंगना राणावतने २० नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी संबोधून आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. कंगनाच्या या पोस्टनंतर शीख, पंजाबी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंगनाने वारंवार खलिस्तान हा शब्द वापरुन संपलेल्या मुद्दयाला परत जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसिध्दीत राहण्यासाठी सदर अभिनेत्री कोणत्याही मुद्द्यावर बरळत असून, त्याचे पडसाद जनसामान्यांमध्ये उमटत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणी खार (मुंबई) पोलीस स्टेशनमध्ये कंगनावर २९५ (अ) अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल झाला असून, त्याप्रमाणे शहरात तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी २९५ (अ) व देशद्रोहाबद्दल १२४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.