अहमदनगर (प्रतिनिधी) -

पाच वर्षांपासून बंद अन् गंजलेले सिग्नल हीच अहमदनगरची शान... अधिकारी निष्क्रिय, लोकप्रतिनिधींचे फोटोसेशन... हेच नगरमध्ये वाहतूक

सुरक्षा अभियान... अशा घोषणा देत नगरमधील बंद सिग्नलला चपलांचा हार घालून जागरूक नागरिक मंचाच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला.

नगर शहरातील कायनेटिक चौक, सक्कर चौक, स्वस्तिक चौक आदी ठिकाणी 25 लाख रूपये खर्च करून सिग्नल उभारले आहे. मात्र, हे सिग्नल गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानअंतर्गत सरकारी अधिकार्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून फक्त फोटोसेशनपुरता अभियानाचा फार्स केला जातो. त्याच्या निषेधार्थ ही गांधीगिरी केली असल्याचे मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी सांगितले.

सक्कर चौकातील बंद सिग्नलला चपलांचे हार घालून त्यावर ‘ही पहा पाच वर्षापासून बंद असलेल्या सिग्नलची अहमदनगरची शान.. आम्ही करतो फक्त फोटोसेशन वाहतूक सुरक्षा अभियान’, अशा आशयाचे फलक टांगून जाहीर निषेध करत सिग्नलला चप्पलचा हार घालण्यात आला.

नगरमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधी केवळ फोटोसेशन करीत आहेत. आम्ही आजच्या आंदोलनाचे फोटो वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवून नागरिकांच्या होणार्या फसवणुुकीकडे लक्ष वेधणार आहोत, असेही मुळे यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात सुनील पंडित, कैलास दळवी, बाळासाहेब भुजबळ, जय मुनोत, वसंत लोढा, नितीन भुतारे, राजेंद्र पडोळे, नंद प्रकाश शिंदे, दत्ता गायकवाड, अभय गुंदेचा, योगेश गणगले, मिलिंद कुलकर्णी, मिलिंद मोभारकर, राम शिंदे आदी उपस्थित होते.