
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नगर येथे नोकरीसाठी पहिल्या दिवशी हजर राहण्या अगोदरच पहाटेच श्रीरामपूर शहरातील एका तरुणाने अगोदर स्वतःची मोटारसायकल जाळून त्यात स्वतःला जाळून घेतले. लोणी येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. यात त्याने आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला याबाबत त्याच्या नातेवाईकांसमोर प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे पोलीस आता याचा कसा तपास लावतात याकडे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2, वैदूवाड्यामध्ये राहणार्या विशाल रामा शिंदे (वय 24) हा परवा रात्री लोणी येथून एका कंदूरीच्या कार्यक्रमाला जाऊन आला होता. त्यानंतर तो घरी येऊन झोपला. नेहमीप्रमाणे तो पहाटे उठला. पहाटे तो जिमला जात असत. त्यामुळे घरच्यांनाही तो गाडी घेऊन जिमला गेला, असे वाटले. परंतु, थोड्यावेळाने त्याच्या वडिलांना आणि नातेवाईकाला विशालने मोबाईलवर कॉल केला व कॉलेजच्या पाठीमागे चिंचेच्या बागेत माझी गाडी आणि मी जळत असल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे नातेवाईक आणि वडिलांना धक्का बसला. त्याठिकाणी तातडीने नातेवाईक. धावले. त्यांनी जळत असलेल्या विशालला विझवले आणि तातडीने रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी विशाल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशालच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. विशाल शिंदे या तरूणाने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समोर आले नाही. विशेष म्हणजे कालच त्याची दुसर्या ठिकाणी नोकरीसाठी हजर होणार होता; परंतु, हजर होण्यापूर्वीच पहाटे विशाल याने आत्महत्या केली. आदल्या दिवशी तो लोणीला कंदरीला गेला होता. त्यामुळे विशाल याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली? याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाही. त्याला एवढ्या पहाटे कॉलेजच्या मागे चिंचेच्या बागेत बोलावून घातपात तर केला नसावा ना? परंतु, या आत्महत्येची परिसरात जोरदार चर्चा आहे. याबाबत पोलीस कसा तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.