श्रीरामपुरात तरुणाची हत्या

दोन संशयित ताब्यात || चौकशी सुरू
श्रीरामपुरात तरुणाची हत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना काल बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरातील संगमनेर रोडवरील हॉटेल पुनमच्या मागे असलेल्या परिसरात काही तरुणांचे किरकोळ वाद झाले. त्यातच अज्ञात तरुणांनी वॉर्ड नं 2 मधील शाहरुख उस्मान शाह (वय 28) या तरुणाच्या डोक्यात कडाप्प्याने जोराचा आघात केला. त्यामध्ये शाहरुख शाह हा तरुण जागीच ठार झाला.

घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली. वॉर्ड नं 2 मधील तरुण मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते.जमलेल्या नागरिकांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी केली.

शाहरुख शाह याचा मृतदेह येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञात मारेकर्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शाहरुखची हत्या कोणत्या कारणाने व कुणी केली, याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com