श्रीरामपुरात मोटारसायकलवरुन जाणार्‍या माळवाडगावच्या महिलेची पर्स लांबविली

चालू गाडीवरुन महिला खाली पडून जखमी
श्रीरामपुरात मोटारसायकलवरुन जाणार्‍या माळवाडगावच्या महिलेची पर्स लांबविली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील माळवाडगाव येथील महिला दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी आली असता शहरातील श्रीरामपूर-नेवासा रोडवरील धान्य मार्केट कमानीसमोर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी दागिने व रोख रक्कम असा 71 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स हिसकावून नेली. यावेळी महिला मोटारसायकलवरुन खाली पडून जखमी झाली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील माळवाडगाव येथील सविता रावसाहेब दळे (वय 38) ही महिला तिच्या मुलाबरोबर दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी श्रीरामपूर शहरात मोटारसायकलवरुन आली होती. खरेदी करुन पुन्हा मोटारसायकलवरुन माळवाडगावकडे जात असताना श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील धान्य मार्केट कमानीसमोरच पाठीमागून लाल रंगाची एसएफ डिलक्स कंपनीच्या विना नंबरच्या मोटारसायकलवरुन आले आणि पाठीमागे बसलेल्या इसमाने सविता दळे यांच्या हातात असलेली 71 हजार रुपयाचे सोन्याचे मंगळसुत्र व रोख रक्कम असलेली पर्स बळजबरीने ओढून लांबविली.

यावेळी पर्स ओढतांना झटका लागल्याने सविता दळे ह्या चालू मोटारसायकलवरुन खाली पडल्या. यात त्यांच्या दोन्ही हात व पायाला, गुडघ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेवून उपचार करण्यात आले.

याप्रकरणी सविता रावसाहेब दळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा रजि. नं. 967/2022, भादंवि कलम 394, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन बोरसे हे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com