श्रीरामपूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता द्या

ना. विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे मागणी
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस अमृत 2.0 योजनेतून मंजुरी देण्यात यावी याबाबत जिल्ह्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात ना.विखे पाटील यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन श्रीरामपूर नगरपरिषदेने शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रुपये 178.60 कोटी रकमेच्या रीतसर प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. तांत्रिक मान्यतेनंतर अमृत 2.0 योजनेतून त्यास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तरी सदर योजना ही श्रीरामपूर शहरातील जनतेच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेस अमृत 2.0 योजनेतून प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.

मध्यंतरी ना.राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर शहर दौर्‍यावर आले असता विखे समर्थक व भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह शहरातील नागरिकांनी रखडलेल्या विकासाबाबत चर्चा करून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार विविध विकास कामांसाठी दोन टप्प्यात 12.5 कोटी रुपये नगरपरिषद हद्दीत मंजूर करण्यात आले. वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यास भविष्यातील 40 वर्षांचा श्रीरामपूर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. ज्यामध्ये मातीचा साठवण तलाव आरसीसी करणे, जुन्या पाईपलाईन बदलणे, नवीन वसाहतीत पिण्याच्या पाईपलाईन टाकणे, शहरातील पाण्याच्या टाक्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती दीपक पटारे व केतन खोरे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com