श्रीरामपूर होणार वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

सुधारित प्रशासकीय मान्यता
श्रीरामपूर होणार वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हे देखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी अत्यंत काटेकोरपणे करणे तितकेच महत्त्वपूर्ण असल्याने स्वयंचलित यंत्रणेमार्फत गाड्यांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी शासनाने वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रे स्थापन करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात श्रीरामपूरचाही समावेश आहे.

मुंबई (पश्चिम), सोलापूर, श्रीरामपूर, लातूर, नागपूर (ग्रामीण), सातारा, बारामती, बुलडाणा, नांदेड, अंबेजोगाई, अकोला, परभणी, वाशिम तळोजा (पनवेल), हिंगणा (नागपूर), दिवे घाट (पुणे), औरंगाबाद, मोशी (पिंपरी-चिंचवड), अमरावती, नांदिवली (कल्याण), कोल्हापूर, ताडदेव (मुंबई), मर्फी (ठाणे) या ठिकाणी वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्रे स्थापन होणार आहे. यासाठी 449 कोटी, 7 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

फिटनेस चाचणीमध्ये गाडीचे लाइट, ब्रेक, टायर, इंजिन आदींची संपूर्ण तपासणी करण्यात येते. त्यासाठी टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिले जात असून गाडी व्यवस्थित असल्यास आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. चाचणीच्या वेळी गाडीमध्ये काही दोष आढळल्यास वाहन चालकाला गाडीची पुन्हा फिटनेस चाचणी करावी लागते. मात्र, फिटनेस चाचणीमध्ये आरटीओचे अधिकारी हलगर्जीपणा दाखवत असल्याची बाब यापूर्वी समोर आली आहे. त्यामुळे निरीक्षकाबरोबर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना निलंबित करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.

आता सर्व अधिकारी कामावर रुजू झाले असले तरी गाड्यांची तपासणी व्यवस्थित होत नसल्याचा मुद्दा अधूनमधून समोर येत आहे. फिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली होती. वाढत्या रस्ते अपघाताला विविध कारणे असले तरी गाडी सुस्थितीत नसणे, हे देखील अपघात घडण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. आजही रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. त्यामुळे फिटनेस चाचणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र स्थापन करण्यासाठी काही अटी देखील असून कार्यालयाकडे स्वमालकीची जागा उपलब्ध असणे, केंद्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जागेवर स्थापन करायचे असल्यास त्या जागेसंदर्भात महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

मानवी हस्तक्षेप कमी होईल

वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र स्थापन झाल्यास मशीनद्वारे गाड्यांची तपासणी करून आरटीओ निरीक्षक योग्यता प्रमाणपत्र देतील. एकप्रकारे ही स्वयंचलित यंत्रणा आहे. शिवाय यामुळे चांगल्या प्रकारे गाडीची तपासणी होईल असे आरटीओमधील वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. नवीन यंत्रणेमुळे परिणाम चांगले येतीलच तसेच तपासणीमधील मानवी हस्तक्षेप कमी होईल, अशी शक्यता या अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com