श्रीरामपूर : महांकाळवाडगावच्या दोन तरुणांचा गोदापात्रात बुडून मृत्यू
सार्वमत

श्रीरामपूर : महांकाळवाडगावच्या दोन तरुणांचा गोदापात्रात बुडून मृत्यू

एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

Nilesh Jadhav

माळवाडगाव | वार्ताहर | Malvadgaon

करोना महामारी संकटामुळे मोठ्या महादेवासह इतर देवस्थाने दर्शनासाठी बंद असल्याने पहाटे सुर्योदयाबरोबर गावातील गोदा काठावर स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊ, असा विचार करून सकाळी सहा वाजता घरून निघालेल्या महांकाळवाडगाव येथील सचिन बाजीराव वानखेडे (28), भाऊराव पांडुरंग वानखेडे (35) या तक्षलणांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना तिसर्‍या श्रावणी सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

श्रावण महिन्यात देवाला पाणी घालायची प्रथा आहे. या पाणवठ्यावर गावातील भरपूर तरुण सकाळी देवाला पाणी घालण्यासाठी येतात. नित्यनियमाने पाऊस असला तरीही हे दोघे येत. दररोज घरून आंघोळ करून येत अन् नदीचे पाणी भरून देवाला वाहत असे. आज मात्र तिसरा श्रावणी सोमवार असल्याने रोजच्या वेळेपेक्षा अगोदर येऊन घरी आंघोळ न करता नदीवर आंघोळीसाठी आले होते.

नेहमीच्या वेळेत वर्दळ असती तर मदत कार्य निश्वित मिळाले असते. मोटारसायकल, कपडे, चप्पल काठावरच पडलेले होते. बहुतेक अगोदर एक बुडाला असावा त्यास वाचविण्यासाठी दुसर्‍याने त्यास मदत करणार्‍या अगोदर जोराने मदतीची आर्त हाक दिली. दूरवर असलेल्या तरुणांनी हाक ऐकून धाव घेतली परंतु दोघेही दिसेनासे झाले.

सकाळची वेळ असल्याने गावासह शिवारातील वाडी वस्त्यांवर बातमी पसरताच मदतीसाठी नदीवर गर्दी झाली. 9 च्या सुमारास भाऊरावचा मृतदेह होडी गळाच्या सहाय्याने सापडला. दुसरा सचिनचा मृतदेह दुपारी 1.30 वाजता त्याच पध्दतीने सापडला. पोलिसांनी पंचनामा करून अगोदर भाऊरावचा नंतर सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

गोदाकाठी स्मशानभुमीत सायंकाळी उशीरा एकाचवेळी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही विवाहित असून सचिन यास पत्नी एक मुलगा, एक मुलगी आई, वडील तर भाऊराव यांस पत्नी, 3 मुली, एक मुलगा, आई, वडील आहे. या घटनेमुळे महांकाळ वाडगाववर शोककळा पसरली आहे.

पोलीस निरीक्षक मसूद खान, तहसिलदार प्रशांत पाटील दुसरा मृतदेह सापडेपर्यंत घटनास्थळी मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. पोलीस पाटील रंगनाथ चोरमल, खानापूरचे पोलीस पाटील संजय आदीक, दत्तात्रय पवार, अशोक कारखाना संचालक नारायण बडाख, उपसरपंच अर्जून दातीर, कामगार तलाठी अरूण हिवाळे, हेमंत डहाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे, अशोक पवार गावातील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ मदत कार्यासाठी उपस्थित होते.

हातातील धातुचे कडे अन कंबरेचा करदोरा आला कामी

पोहता येत नसल्याने कपडे काठावर काढून फक्त अंडरप्यांटवर दोघे स्नानासाठी गुडघाभर पाण्यात उतरत असताना तोल गेला असावा. हातातील पंचधातूचे कडे त्यांच्या भोवती असलेल्या रक्षाबंधनाच्या राख्या गळाला अडकल्याने पहिल्या दिड तासात भाऊरावचा मृतदेह सापडला. सचिनचा मृतदेह सापडण्यास साडेसहा तास लागले. अखेर कमरेचा करदोरा दुपारी 1.30 वाजता गळाला अडकला अन् सकाळपासून अन्नपाण्याविना अविरत परिश्रम घेणार्‍या होडीवरील आदिवासी व अन्य पट्टीच्या पोहणार्‍यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com