श्रीरामपूर ते टाकळीभान राज्यमार्गाचे भाग्य कधी उजळणार

धुळीच्या लोटाने व्यावसायिक त्रस्त
श्रीरामपूर ते टाकळीभान राज्यमार्गाचे भाग्य कधी उजळणार

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

नगर-मनमाड व नगर-औरंगाबाद या दोन मुख्य महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला व अत्यंत वर्दळीच्या असलेल्या श्रीरामपूर-टाकळीभान ते नेवासा या राज्यमार्गाचे सुरू असलेले दुरुस्तीचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. या राज्यमार्गाचे भाग्य कधी उजळणार? असा प्रश्न विचारला जात आहे. रस्ता दुरुस्ती कासवगतीने सुरू असल्याने रस्त्यावरून उठणार्‍या धुळीच्या लाटांमुळे या राज्यमार्गालगतचे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

मराठवाडा विदर्भात जाणारा नगर औरंगाबाद महामार्ग व उत्तर महाराष्ट्रात जाणारा नगर मनमाड महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा बाभळेश्वर ते नेवासाफाटा हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. त्यामुळे या राज्यमार्गावर वाहनांची मोठी वर्दळ दिवस रात्र सुरू असते. त्यातच ऊस गळीत हंगाम सुरु असताना हा राज्यमार्ग वाहनांनी फुललेला असतो. जगप्रसिध्द देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला येणार्‍या जाणार्‍या भक्तांचीही मोठी वर्दळ या राज्यमार्गावर असते.

अत्यंत वर्दळीच्या असलेल्या व महत्त्वाच्या राज्यमार्गाची गेल्या दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. आ. लहु कानडे यांनी गेल्या वर्षी या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून सुमारे 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष दुरुस्तीचा शुभारंभही मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही राज्यमार्गाची अवस्था दयनिय आहे. दुरुस्तीसाठी काम करणारी ठेकेदार कंपनी अत्यंत कासवगतीने राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे काम करीत आहे.

सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने रहदारी प्रचंड वाढलेली आहे. राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरुच असून राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वारांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यमार्गालगत व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांनाही या धुळीचा फटका बसत आहे. राज्यमार्गालगत वास्तव्यास असलेल्या नागरिकांची राहती घरेही धुळीने माखली आहेत. धुळीमुळे व्यावसायिक व नागरिक प्रचंड त्रस्त असल्याने या राज्यमार्गाचे भाग्य कधी उजळणार?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाभळेश्वर ते नेवासाफाटा या राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुमारे वर्षभरापासून सुरू आहे, या अंतरात वेगवेगळ्या ठेकेदार कंपन्या दुरुस्तीचे काम करीत आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण होऊन राज्यमार्ग लवकर वहातुकीसाठी सुरळीत सुरू व्हावा, यासाठी चार ते पाच ठेकेदार कंपन्यांना हे काम दिल्याचे सांगितले जात होते. यापैकी टाकळीभान ते विटभट्टी या सुमारे तीन ते साडेतीन कि. मी. चे अंतराचे काम त्या ठेकेदार कंपनीने वेगात पूर्ण केले. उर्वरीत ठेकेदार कंपनीचे काम कासव गतीने सुरू असल्याने याचा त्रास वाहनधारक, व्यापारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com