श्रीरामपूर शहरासह तालुक्याला वादळाचा तडाखा

कांदा उत्पादकांचे नुकसान || भोकर शिवारात घराची पत्रे उडाली || वीजपुरवठा खंडित झाल्याने बारा गावे अंधारात || राज्य मार्गावरील झाडे पडल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक
श्रीरामपूर शहरासह तालुक्याला वादळाचा तडाखा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील वडाळा महादेव, हरेगाव, गोंधवणी भागात काल जोरदार वादळामुळे रस्त्यांवर झाडे पडली आहेत. पावसाचा जोर कमी होता मात्र या कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींच्या घरांची पत्रे उडाली तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळत असलेल्या दिसत आहेत. त्यात काही ठिकाणी दुपारपासून वीज गायब झाली होती.

गोंधवणी येथील नगरपरिषद कॉलनी प्रभाग दोनमध्ये दत्तमंदिराजवळच असलेली झाडे या वादळामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच शहरात व तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. काल दुपारपासूनच शहरातील बर्‍याच भागात वीज गायब झाली होती. पोलीस स्टेशनसह अन्य कार्यालयातील कामकाज ठप्प होते.

शिरसगाव ब्राम्हणगाव परिसरात अचानक आलेल्या वादळ व पावसाने ब्राम्हणगाव रस्त्यावर तसेच शिरसगाव ते गोंधवणी रस्त्यावर अनेक मोठी झाडे पडली आहेत. यामुळे दोन्ही रस्ते वाहतुकीला बंद झाले आहेत. फक्त दुचाकी कशाबशा कसरत करून निघत होत्या. ब्राम्हणगावकडे जाणार्‍या रस्त्यावर झाडे पडल्याने विजेचे खांब वाकले तारा तुटल्या. या भागात पावसाबरोबर गारासुद्धा पडल्या आहेत. शेतकर्‍यांची कांदा चाळी पिके आदींचे नुकसान झाले. शिरसगाव मंदिराजवळही एक झाड पडले. तेथील फ्लेक्स बोर्ड फाटले. रस्त्यावरील झाडे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. कॉलेज ते शिरसगाव रोडवर झाडे पडली. आशीर्वादनगर ते हरिओमनगर रस्त्यावर मोठे झाड पडल्याने रस्ता बंद झाला. पहिल्याच पावसाने झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. तसेच हरेगाव फाटा ते तीनवाडीपर्यंत 4 ते 5 मोठी झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव तसेच हरेगाव रोड परिसरात वादळी वार्‍याच्या तडाख्याने रस्त्यावरच झाडे उन्मळून पडली .साधारण पाच वाजेच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असून सुसाट वारे सुरू होते. यामुळे अनेक ठिकाणी असलेली वृक्ष उन्मळून पडली. तसेच काही झाडांच्या फांद्या खाली पडल्या. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतकर्‍यांची शेतीची मशागत तसेच कांदा चाळीमध्ये भरण्यासाठी लगबग सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची पळापळ सुरू झाली. यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींचे छपराचे तसेच घरांची पत्रे उडाली आहेत.

भोकर शिवारात घराची पत्रे उडाली

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात काल सायंकाळी झालेल्या वादळाने भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरात असलेल्या अण्णासाहेब भोईटे शेतकर्‍याचे राहत्या घराच्या छताचे पत्रे उडून सुमारे पन्नास फूट लांब जाऊन पडले. यामुळे या शेतकर्‍याच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या वादळाने परीसरातील खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे बारा गावे अंधारात होती.

भोकर परीसरात काल बुधवार दि. 1 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळाने शिवारातील हनुमानवाडी परीसरातील गट नं.381 मध्ये वस्ती करून राहत असलेले अण्णासाहेब माधव भोईटे यांच्या राहत्या घराच्या छतावरील पाच पत्रे अँगलसह उडून घरापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर असलेल्या खानापूर रोडजवळ जाऊन पडले. सुदैवाने या रस्त्यावर कुणीही नव्हते म्हणून दुर्घटना टळली तसेच भोईटे यांचे कुटुंबातील सदस्यही सुरक्षीत आहेत. परंतु या कुटुंबातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

या वादळा दरम्यान महावितरणच्या भोकर सबस्टेशनला नेवासा येथून होणारा वीजपुरवठा खंडित झाल्याने या सबस्टेशन अंतर्गत येणारी बारा गावे अंधारात होती. त्या भोकर, खोकर, मुठेवाडगाव, माळवाडगाव, निापणीवाडगाव, कारेगाव, कमालपूर, घुमनदेव, टाकळीभान, खानापूर आदी गावे काल सायंकाळपासून अंधारात होती. महावितरणचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत नेवासा येथून येणार्‍या वीज पुरवठ्यात आलेला अडथळा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत होती.

वादळाने श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गाचे रूंदीकरणाचे धिम्यागतीने सुरू असलेल्या कामा दरम्यान या राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेली झाडे संबंधितांनी काढण्यासाठीची प्रक्रीया अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. दरम्यान या रस्ता रूंदीकरणादरम्यान अडथळा ठरत असलेल्या अनेक झाडांच्या बुंध्यालगत रस्ते खोदल्याने कालच्या वादळाने अशा प्रकारची अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले. परंतु काही झाडांच्या फांद्या तोडून या राज्यमार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक ठिकाणी रात्री एकेरी वाहतूक सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com