
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांसाठी काल रविवारी 79.30 टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. उद्या मंगळवार दि. 20 रोजी तहसील कार्यालयात त्याची मतमोजणी होणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यात जाहीर झालेल्या सहा ग्रामपंचायतीपैकी कमालपूर व वांगी खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत माळेवाडी, उंबरगाव, वांगी बुद्रुक व खंडाळा या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी काल मतदान झाले. दिवसभर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
काल सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 15 टक्के मतदान झाले होते. दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. सायंकाळी मात्र मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. यातील उंबरगाव येथे 80 टक्के, वांगी बुद्रुक येथे 81 टक्के, माळेवाडी येथे 83 टक्के तर खंडाळा येथे 76.40 टक्के मतदान झाले. या ठिकाणी मोठी चुरस दिसून आली.
श्रीरामपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या चार सरपंचपदासाठी 9 तर 40 सदस्यपदांसाठी 80 उमेदवार रिंगणात होते. बिनविरोध झालेल्या कमालपूर व वांगी खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतीवर मुरकुटे व ससाणे-मुरकुटे गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी 81 टक्के मतदान झाले. येथे सदस्यपदासाठी 7 जागासाठी 14 उमेदवारांत एकास एक अशी लढत झाली. तर सरपंचपदासाठी तीन उमेदवार होते. माळेवाडी ग्रामपंचायतीसाठी 83 टक्के मतदान झाले. येथे 9 सदस्यपदासाठी 19 उमेदवारांत तर सरपंचपदासाठी दोन जणांत सरळ लढत झाली. उंबरगाव ग्रामपंचायतीसाठी 80 टक्के मतदान झाले. येथे सरपंचपदासाठी दोन जणात समोरासमोर तर 9 सदस्यपदासाठी 17 उमेदवारांनी लढत दिली.
तालुक्यातील प्रतिष्ठेच्या खंडाळा येथे 76.40 टक्के मतदान झाले. या ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी दोन जणात तर 15 सदस्यपदासाठी 30 उमेदवारांत एकास एक लढत झाली. मतदानासाठी बाहेरगावाहून मतदार आणण्याचे नियोजन सर्वच गावांत करण्यात आले होते. आगामी पाच वर्षांच्या कालावधीत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी इर्शेने प्रचार केला. आता कोण बाजी मारणार ते उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.