श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पट्ट्यातील गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडा

माजी आ. मुरकुटे यांची गृहमंत्री ना. वळसे पाटील यांचेकडे मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पट्ट्यातील गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद, गळनिंब, कुरणपूर, कडीत बु॥, कडीत खुर्द व मांडवे ही लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली सहा गावे श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडावेत, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेकडे केली असून याप्रकरणी ना. वळसे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना योग्य ते आदेश दिले आहेत.

यासंदर्भात ना.वळसे पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये माजी आ.मुरकुटे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्याचे विभाजन होऊन राहाता तालुका अस्तित्त्वात येण्यापूर्वी लोणी व प्रवरा परिसराचा श्रीरामपूर तालुक्यात समावेश होता. त्यावेळी वर नमूद सहा गावे ही लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली होती. तथापि, आता राहाता तालुका स्वतंत्रपणे अस्तित्त्वात आला असून सदरच्या सहा गावांचा कोणताही संबंध राहाता तालुक्याशी नाही. सदरची सहा गावे ही श्रीरामपूर तालुक्यातच असल्याने संबंधित गावांच्या नागरिकांना श्रीरामपूर या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी यावे लागते. त्यामुळे सध्या लोणी पोलीस स्टेशनला जोडलेली सदरची सहा गावे ही श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी, अशी मागणी श्री.मुरकुटे यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री.मुरकुटे यांनी राज्याचे गृहमंत्री ना.वळसे पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यावर ना.वळसे पाटील यांनी सकारत्मकता दर्शविली असून संबंधित अधिकार्यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com