श्रीरामपूर तालुका काँग्रेस पदाधिकारी निवडीवरून ससाणे-कानडे यांच्यातील गटबाजी उफाळली

पक्ष निरीक्षकांनीही घेतल्या दोन स्वतंत्र बैठका; ना. थोरात पेच सोडविणार
श्रीरामपूर तालुका काँग्रेस पदाधिकारी निवडीवरून ससाणे-कानडे यांच्यातील गटबाजी उफाळली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी दोन बैठका घेतल्या. दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत पक्ष निरीक्षकांसमोर मोठ्या गटबाजीचे प्रदर्शन केले. पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी दोन्ही गटाकडून नावे आल्याने निवड प्रक्रिया पूर्ण न करता पक्ष निरीक्षक सांगळे यांनी निर्णय घेतला नाही. आता या निवडीचा पेच ना. थोरात सोडविणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ना. थोरात कसा मार्ग काढतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या श्रीरामपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून आ. कानडे गटाचे अरुण पा. नाईक तर शहराध्यक्ष म्हणून ससाणे गटाचे संजय छल्लारे काम पहात आहेत. मात्र पक्षाच्या आदेशानुसार सध्या निवडी होत आहेत. ससाणे व आ. कानडे यांच्यातील मतभेदांमुळे शहराध्यक्षांचा कानडे यांच्याशी संपर्क नाही तर तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक यांचा ससाणे गटाशी संपर्क नसल्यामुळे दोघा गटांनी आपल्याला हवे तसेच शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या.

त्यानुसार श्रीरामपूर काँग्रेस पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी पक्षाचे निरीक्षक व जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे श्रीरामपूर येथे आले होते. यावेळी सर्वप्रथम आ. लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर करण ससाणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात दुसरी बैठक पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दोन्ही बैठकांना शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

काँग्रेस पक्षाने दोन महिन्यांपूर्वी डिजिटल सदस्य नोंदणीची मोहीम राबविली होती. त्याला मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीणसाठी 310 बुथ प्रतिनिधी तर शहरात 77 प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. सदस्य नोंदणीसाठी आ. कानडे व ससाणे यांच्याकडून स्वतंत्रपणे मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे आपणच सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा स्वतंत्रपणे आ. कानडे व ससाणे यांनी पक्ष निरीक्षकांसमोर केला.

या बैठकीदरम्यान, आ. कानडे गटाकडून तालुकाध्यक्ष पदासाठी अरुण पा. नाईक व शहराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. समीन बागवान यांची नावे तर ससाणे गटाकडून तालुकाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पाऊलबुद्धे व शहराध्यक्ष पदासाठी मुळा प्रवराचे संचालक संजय छल्लारे यांची नावे देऊन त्यांचे अर्ज दाखल केले आहेत. सध्या श्री. नाईक (आ. कानडे गट) तालुकाध्यक्ष तर छल्लारे (ससाणे गट) शहराध्यक्षपदाचे कामकाज पाहत आहेत. दोन्ही गटांकडून नावे आल्याने निवडीचा पेच निर्माण झाला. निवडीबाबत एकमत न झाल्याने पक्ष निरीक्षक श्री. सांगळे यांना पदाधिकार्‍यांची निवड न करताच माघारी परतावे लागले. त्यामुळे आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत निर्णय घेणार आहेत.

श्रीरामपूर तालुकाध्यक्षांनी या बैठकीसाठी ठराविक लोकांनाच मेसेज पाठवून आंमत्रित केले होते. त्यामुळे ससाणे गटाच्या लोकांना या बैठकीचे बोलावणेच नसल्यामुळे त्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविले. शहराध्यक्षांनी शहरातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. तसे तालुकाध्यक्षांनी द्यायला पाहिजे होते. किमान तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना बोलावण्याचे तरी याबाबत काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून त्यांचे काम होते. मात्र त्यांनीच गटबाजी केल्याचा प्रकार आढळून आला.

श्रीरामपूर तालुका काँग्रेस निवडीचा अधिकार हा जिल्हा काँगे्रस पदाधिकार्‍यांचा असतो. त्यांच्या सहीने निवडीचा कार्यक्रम निघाला होता. मी काँगे्रस तालुकाध्यक्ष असल्याने माझ्या निवडीचा कार्यक्रम मीच कसा काढू शकतो. काँग्रेेस कमिटीने आमदारांना बैठक घेण्याची सूचना केली होती. जिल्हा काँग्रेसच्या आदेशानुसार आमदारांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी त्यांनी बैठकीला येणे अपेक्षीत होते. त्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे गटबाजी कशी झाली हे उघड आहे., असे काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com