श्रीरामपूर ते टाकळीभान राज्यमार्गावरील धुळीने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
नगर-मनमाड व नगर-औरंगाबाद या दोन मुख्य महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा व अत्यंत वर्दळीच्या असलेल्या श्रीरामपूर-टाकळीभान ते नेवासा या राज्यमार्गाचे सुरू असलेले दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासुन राज्यमार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. कानडे यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
मराठवाडा, विदर्भात जाणारा नगर-औरंगाबाद महामार्ग व उत्तर महाराष्ट्रात जाणारा नगर-मनमाड महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा बाभळेश्वर ते नेवासाफाटा हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. त्यामुळे या राज्यमार्गावर दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यातच ऊस गळीत हंगाम सुरू असताना हा राज्यमार्ग वाहनांनी फुलला आहे. जगप्रसिध्द देवस्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीला येणार्या जाणार्या भक्तांचीही मोठी वर्दळ या राज्यमार्गावर असते.
अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या राज्यमार्गाची दुरवस्था गेल्या दोन वर्षांपासून झाली आहे. श्रीरामपूर तालुक्याचे आ. लहु कानडे यांनी झालेली दुरवस्था पाहून गेल्यावर्षी राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करुन सुमारे 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. राज्यमार्गाच्या दुरुस्तीचे गेल्या एक वर्षापुर्वी काम सुरू आहे. दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. राज्यमार्ग खडबडीत झालेला असल्याने वाहनांची आदळआपट टाळण्यासाठी वाहनचालक नव्याने दोन्ही बाजुने झालेल्या कच्च्या रस्त्यावरून वाहने दामटतात.
त्यामुळे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट सुरू असतात. ही धुळ राज्यमार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी पडशाचे विकार जडलेले पहावयास मिळत आहेत. तर लहान बालकांनाही या धुळीचा त्रास सुरू झाला आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
आ. कानडे यांनी राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून निधी मिळविला आहे. त्यामुळे राज्यमार्गाच्या दुरुस्तीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र ठेकेदार कंपनीकडून दुरुस्तीचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने वर्षभरापासून नागरिक या धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून नागरिकांना धुळीपासून मुक्ती देण्यासाठी तातडीने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे आ. कानडे यांनी ठेकेदार कंपनीला समज देऊन लवकरात लवकर डांबरीकरणाच्या कामात लक्ष घालावे, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आाहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही धुळीने त्रस्त झालेल्या नागरिकाकडून होत आहे.