श्रीरामपुरातील बळीराजाची दिवाळी प्रशासनाच्या दारात

तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाण्याचे आंदोलन
श्रीरामपुरातील बळीराजाची दिवाळी प्रशासनाच्या दारात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकर्‍यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाण्याचे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.

श्रीरामपूर तालुक्यात होत असलेल्या अतिरिक्त पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप पिके काढणीस खुप उशीर होत असून रब्बीसाठी मशागत करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीला उशीर होत आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या उत्पादनावर होणार आहे.

शेतकर्‍यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन शासनाने श्रीरामपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला मदत करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ऐन दिवाळीत शांततेच्या मार्गाने खर्डा भाकरी खाण्याचे आंदोलन केले.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलग दुसर्‍या वर्षी श्रीरामपूर तालुका शासनाच्या मदतीपासून वंचित आहे. कारण 24 तासांत 65 मिली. पर्जन्यमान झाल्यानंतरच शासन पाहणी करते. परंतु 7-8 दिवसांत रोज पाऊस झाल्यास पिकांची मुळे सडतात. जमिनीलगतच्या शेंगा, बोंडे सडतात. या नुकसानीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रतिक्रीया आंदोलनातील शेतकर्‍यांनी दिल्या.

याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, छावा आदी संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते. तहसीलदारांचे प्रतिनिधी श्रीनाथ यांनी निवेदन स्विकारले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, बाबासाहेब कोळसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, छावाचे अ‍ॅड. सुभाष जंगले, शिरसगाव सोसायटीचे अध्यक्ष किशोर पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले, कर सल्लागार विजयराव कोळसे, राजाराम गवारे, सुरेश ताके आदींनी शेतीच्या दुरावस्थेविषयी व शेतकरी प्रश्नांवर भाषणे केली.

आंदोलनात शिवसेनेचे डॉ. दिलीप शिरसाठ, राजेंद्र पाऊलबुध्दे, पढेगावचे सरपंच किशोर बनकर, साईनाथ गवारे, दत्तात्रय लिप्टे, ज्ञानदेव वाबळे, शरद पवार, बबनराव उघडे, अ‍ॅड. विलास थोरात, साईनाथ गवारे, किरण नवले, ज्ञानेश्वर सोडणार, संदीप गवारे, ईश्वर दरंदले, ज्ञानदेव थोरात, बाळासाहेब पडोळे, मच्छिंद्र आढाव, शिवाजी भालदंड, शिवाजी वाबळे, अरुण कवडे, गोरक्षनाथ पवार, गणेश ठाणगे, संजय पाऊलबुध्दे, मनोज बोडखे, अनिल रोकडे, किशोर नाईक, सचिन काशिद, अंगद आढाव, संजय गवारे, सोमनाथ गांगड, किरण ताके, अनिल ताके, देवीदास सलालकर व शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तालुक्यात नुकसानीची पाहणी दौर्‍यावर आले असता शेतकर्‍यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com