
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
करोना रुग्णांना बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ थांबवावी, यासाठी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या देखरेखीखाली श्रीरामपूर तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला असून ही सेवा नागरिकासाठी 24 तास सुरु राहणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. अशा अवस्थेत रुग्णांना या दवाखान्यातून त्या दवाखान्यात नेताना नातेवाईकांची फरफट होत असल्याचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध व्हावा, याकरिता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात नायब तहसीलदार छाया चौधरी, अमोल ऐडके, अ. का. संगाया, शिवशंकर श्रीनाथ महसूल सहाय्यक व नवनाथ मंडलीक शिपाई यांची नियुक्ती केली आहे. श्रीरामपूर तहसील कार्यालयाचा दूरध्वनी 02422-222250 असून नागरिकासाठी हे अधिकारी व कर्मचारी 24 तास उपलब्ध असतील, असे पवार यांनी सांगितले.
या कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांनी तालुक्यातील शासकीय, खाजगी रुग्णालयातील केंद्राची यादी तसेच दर दोन तासांला उपलब्ध बेड आँक्सिजन व जनरल बेड यांची संख्या प्राप्त करून घ्यावयाची आहे. कोवीड रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय, खाजगी केंद्राशी समन्वय ठेवून उपलब्ध असणार्या बेडबाबत नागरिकांना अचूक माहिती द्यावयाची आहे. त्यामुळे गरजुंना कोणत्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहे हे तातडीने समजणार आहे. तसेच रुग्णांची व नातेवाईकांची धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
सदरचेे काम जबाबदारीने करण्याच्या सूचनाही उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या असून यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई देखील करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी पवार यांनी दिला आहे. उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी स्थापन केलेल्या या कक्षातून कोणत्या दवाखान्यात किती बेड उपलब्ध आहे, याची अचूक माहिती नातेवाईकंना मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळही वाया जाणार नाही. तसेच काही ठिकाणी बेड उपलब्ध असतानाही जागाच शिल्लक नाही असे सांगितले जात होते. परंतु आता केंद्रांना योग्य व अचूक माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.