
खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav
राज्य शासनाने ठरवून दिलेले परिपत्रक डावलून श्रीरामपूर दुय्यम निबंधक कार्यालयात राजरोसपणे बेकायदेशीर व्यवहार केले जात आहे. यासाठी सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पैशांची मागणी केली जात आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागडे यांनी म्हटले आहे की, मानवी बिनशेती, गुंठेवारी खरेदी करण्यासाठी प्रति गुंठा पाच हजार रुपयांची मागणी श्रीरामपूर दुय्यम निबंधक कार्यालयाकडून केली जात आहे. परंतु शासनाने ठरवून दिलेले परिपत्रकात अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसताना केवळ पैसा उकळण्यासाठी सर्वसामान्य माणसांची लूट होत आहे. सर्वसामान्य माणसेही आपले काम अडवू नये म्हणून ही मागणी पूर्ण करीत आहेत.
सामान्य जनता ही नियमाप्रमाणे शासनाकडे चलनाद्वारे आपले पैसे भरत असतात. परंतु त्या व्यतिरिक्तही खरेदी खत, मृत्युपत्र यासाठी मोठ्या रकमेची मागणी होत असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. गरीब जनता या प्रकारामुळे होरपळून निघत असून या प्रकाराची गांभीर्याने चौकशी होऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी लवकरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार सांगितला जाणार आहे. संबंधित व्यवहाराची चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला आहे.