श्रीरामपूर तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

शहरातील गुरुनानकनगरमध्ये वीज पडली
श्रीरामपूर तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. चार ते पाच वेळा विजांच्या कडकडाटांचा आवाज आल्याने जवळपास कुठेतरी वीज पडली असण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र शहरातील गुरुनानकनगरच्या गेटवरील एका विजेच्या खांबावर वीज पडली. कोणतीही जिवीत दुर्घटना अथवा हानी झाली नाही.

काल दिवसभर अंगाची लाहीलाही होऊन अंगात घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता काल दुपारपासूनच जाणवत होती. त्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवशी काल पुन्हा पावसाने जोरदार हजेरी दिली. सुरुवातीला वादळीवार्‍याने पाऊस पडणार नाही अशी शक्यता होती मात्र काही वेळातच विजांचा कडकडाट होवून पावसास सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास मुसळधार पाऊस झाला या पावसादरम्यान चार ते पाच वेळा विजांचा मोठा कडकडाट झाला.

शहरातील गुरुनानकनगरच्या गेटजवळच असलेल्या विजेच्या खांबावर वीज कोसळली. वीज खांबावर कोसळताच मोठा जाळ झाला. मात्र जवळपास कोणीही नसल्याने जिवीत हानी झाली नाही. अथवा नुकसानही झाले नाही. शहरात तर पाणीच पाणी झाल्यामुळे गटारी, नाले पाण्याने वाहू लागले. रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखाली मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने काहीकाळ दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प होती. अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील गोंडेगाव, निमगाव खैरी, दिघी परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. रस्त्याने जाणार्‍यांना पुढील रस्ता दिसत नव्हता. मात्र नाऊर, मुठेवाडगाव, माळवाडगाव सराला बेट, भामाठाण, भोकर, गुजरवाडी, टाकळीभान परिसरात मात्र काहीसा पाऊस झाला.

वडाळा महादेव, उंदिरगाव, हरेगाव, शिरसगाव, खंडाळा, नांदूर, ममदापूर, गळनिंब, दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे, रांजणखोल, बेलापूर, उंबरगाव, पढेगाव, उक्कलगाव, फत्याबाद, मांडवे, कुरणपूर या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या दिलासा मिळाला असला तरी शेतकर्‍यांना मात्र कशी खुशी कही गम अशी परिस्थिती झाली आहे. तर विजेच्या कडकडाटामुळे,जनावरे व प्राणी आपला जीव मुठीत घेऊन बसले होते.

पाऊस जास्त झाला तर पाणी वाढण्यास मदतच होणार आहे. तसेच सोयाबीनला शेंगाच असल्यामुळे सोयाबीनला धोका राहणार नाही. मात्र कांदा रोपे कोणी टाकले असेल तर त्यांचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील ओढे नाले खळखळून वाहत होते. परिसरात पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याने कालच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरु होताच विजांचा कडकडाट सुरु होताच वीज गायब झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी अंधारच अंधार होता. त्यात पाऊस सुरु असल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. हवामान खात्याकडून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com