श्रीरामपूर शहरासह तालुक्यात गारपिटीसह वादळवार्‍याचा जोरदार पाऊस

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात गारपिटीसह वादळवार्‍याचा जोरदार पाऊस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल सायंकाळी शहरासह तालुक्यात अचानक झालेल्या वादळी, वार्‍यासह तसेच गारांच्या पाऊस चालू असताना ठिकठिकाणी विजेचा कडकडाट झाला. या दरम्यान तालुक्यातील खोकर येथे वीज पडून एका इसमाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी जखमी झाली असून एका गायीचाही मृत्यू झाला. तालुक्यात विविध ठिकाणी या अवकाळी पाऊसामुळे तसेच गारपीटीने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी गहु भूईसपाट झाले असून कांदा, मका, हरबरा पिकांसह द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

तालुक्यातील खोकर येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळासह गारांचा पाऊस झाला. खोकर गावातील इंदिरानगर परिसरात राहत असलेले राजू नामदेव मोरे (वय 50) यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना तातडीने श्रीरामपुरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर राजू मोरे यांच्या पत्नी सुनिता राजू मोरे (वय 45) ह्या गंभीर जखमी झाल्या तसेच एका गायीचा मृत्यू झाला. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून मोरेे कुटुंबियांचे सांत्वन केले.

श्रीरामपूर तालुक्यातील रांजणखोल, गोखलेवाडी, खंडाळा, नांदूर, टिळकनगर, दत्तनगर, हनुमानवाडी, जवाहरवाडी, सुभाषवाडी परिसरासह अनेक भागात वादळी वार्‍यासह गारांचा तसेच विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वार्‍यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता.

गारपिटीने बेलापूर दिघी रोड परिसरातील प्रकाश मेहेत्रे, अनिल कुर्‍हे, सोनू लगे, अशोक मेहेत्रे, नामदेव मेहेत्रे, वाल्मिक भुजाडी, सुधाकर खंडागळे, अर्जुन कुर्‍हे, सारंगधर खंडागळे, शांतवन अमोलिक, किरण कुर्‍हे, संजय शिरसाठ, गोखलेवाडी भागातील एकनाथ दुधाळ, संजय दुधाळ, राजेंद्र दुधाळ, बाळासाहेब दुधाळ, सचीन दुधाळ यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू आहे.

शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे आणि काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे यामुळे नुकसान झाले. पावसात भिजलेला गहू आता पांढरा पडण्याची शक्यता असल्याने त्याला भाव कमी मिळणार आहे. फळबागांचेही नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर वादळ आणि गारांमुळे गळून पडला आहे. डाळींब, द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले. गेल्यावर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. त्याची नुकसानभारपाईही अनेक शेतकर्‍यांना अद्याप मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे.

शिरसगावसह हरेगाव, उंदिरगाव परिसरात तूरळक पावसाच्या सरी पडल्या. रस्ते संध्याकाळपर्यंत कोरडे झाले होते. काल झालेल्या वादळी वार्‍यासह गारांच्या पावसाने मोठे नुकसान झाले. राहाता तालुक्यातील ममदापूर येथेही मोठ्या प्रमाणावर गारांचा तसेच वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने ममदापूरच्या आठवडे बाजारात दाणादाण झाली. या पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

श्रीरामपुर तालुक्यात या अवकाळी व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे कळताच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क करत तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश दिले असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी दिली. तालुक्यातील टाकळीभान या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

शहरातही रिक्षावर झाड पडले

श्रीरामपूर शहरातही वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. या वादळामुळे साधना हॉटेल शेजारी असलेले लिंबाचे मोठे झाड कोसळल्यामुळे त्याखाली रिक्षा दबली गेली. सुर्दैवाने त्यात प्रवासी नव्हते. झाड पडत असल्याचा आवाज आल्याने रिक्षा चालक पवन भिंगारे याने सावधानता बाळगत तेथून रिक्षा सोडून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. पालिका प्रशासनचे कर्मचारी तसेच या परिसरातील माजी नगरसेवक रवी पाटील व त्यांचे सहकार्‍यांसह नागरिकांनी मदत करत हे झाड बाजुला करुन रस्ता मोकळा केला. तसेच रिक्षा बाहेर काढली. यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शहरातील अंडरग्राऊड पुलाखालीही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नागरिकांनी गारा गोळा करत तो खाण्याचाही आनंद घेतला. तसेच शहरालगत असलेल्या गोखलेवाडी परिसरात एकनाथ दुधाळ यांच्यासह अनेक शेतकर्‍यांचा गहू व कांदा पिकाचे या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच किसान कनेक्टचे किशोर निर्मळ यांच्या बंगल्यासमोरील अंगणातही गारा़ंचा मोठा सडा पडला होता. तालुक्यातील खंडाळा परिसरातही या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांचे महसूलचे सहकारी यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसानीची पहाणी केली. तसेच अधिकारी कर्मचार्‍यांकडून माहिती मागविली. या सर्व नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सहकार्य मिळण्यासाठी प्रयत्न करु, असेही तहसीलदार श्री. पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com