
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार काल श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातील चौका-चौकांत शिवजयंती उत्साह दिसून आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिवजयंतीला मोठा राजकीय रंग दिसून आला.
आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शहरात भाजपासह विखे गट , शिवसेना, ससाणे गट, मनसे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. डिजेच्या वाद्याने तर संपूर्ण श्रीरामपूर शहर दणाणून गेले होते. शिवाजी चौकात हिंदुत्ववादी संघटना, भाजपा तसेच अन्य संघटनांनी शिवजयंतीनिमित्त विद्युत रोषणाई तसेच सर्वत्र भगवेमय असे वातावरण तयार केले होते. समर्थ संघटनेनेही डिजेच्या वाद्यावर स्वामी विवेवकानंद चौक शिवमय करुन सोडला होता.
त्यानंतर सावता चौकातही शिवजयंती साजरी करण्यात आली. गिरमे चौकातही भाजपा प्रणित कार्यकर्त्यांनी मोठे स्टेज उभारुन पोवाडे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केेले. त्यानंतर शिव शिल्प स्मारक समितीच्यावतीने तसेच भगतसिंग चौकातही शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. तसेच बेलापूररोडवर हिंदू एकता आंदोलन पक्ष, बजरंगनगर व शिवप्रहार प्रतिष्ठान, संभाजी चौक, मेनरोडवर तुळजा फाउंडेशन, शिवसेना यांच्यावतीनेही महाआरती करण्यात आली. तसेच श्रीराम तरुण मंडळ व राष्ट्रीय श्रीराम सेवा संघ, मनसे, यांच्यावतीनेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
काही मंडळांनी महाप्रसाद तर काहींनी साबुदाणे वडे ठेवले. त्यामुळे चौका चौकांत शिवाजी महाराजांचा गजर दिसून येत होता. चौकाचौकांत स्टेज उभारून शिवाजी महाराजांचा पुतळा, प्रतिमा ठेवून शिवपूजन केले. तसेच चौका-चौकांत भगवे ध्वज, कमानी उभारुन श्रीरामपूर शहर भगवेमय असे करून टाकले होते. शिवसेनेच्यावतीने दांडपट्टा चालविणे, शस्त्र चालविणेचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. तसेच महाआरतीही करण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने अभूतपूर्व अशा वातावरणात ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी कण्यात आल्यामुळे कालचे श्रीरामपुरातील वातावरण शिवमय झाले होते.
शहरातील राम मंदिर चौकात श्रीराम तरुण मंडळ आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या मध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम श्रीराम मंदिर चौकात घेण्यावरून तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने हस्तक्षेप करून दुपारी यावर तोडगा काढत हा वाद मिटविल्याचे सांगितले. मात्र काहीकाळ याठिकाणी वातावरण तणावाचे झाले होते. याठिकाणी श्रीराम तरुण मंडळाचा कार्यक्रम असल्याने दुसर्या मंडळाचा कार्यक्रम घेण्यास श्रीराम तरुण मंडळाने आक्षेप घेत दुसर्या मंडळाच्या कार्यक्रमाला विरोध केला त्यामुळे याठिकाणी गर्दी जमली. डिवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यासह पोलिसांच्या फौजफाटा त्याठिकाणी आला. गर्दी वाढून शिवजयंतीचा तणाव आणखी वाढू नये म्हणून त्वरित प्रशासनाने या सर्वाशी पोलीस ठाण्यात चर्चा केली. दोन्ही मंडळाच्यावतीने केवळ महाराजांना पुष्पहार अर्पण करून उत्सव साजरा करण्याचे ठरले. या तोडग्यावर दुपारी समाधान होऊन वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले.