
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नेवाशातून जरनेटर चोरी करून भंगारात विक्री करणार्या श्रीरामपुरातील चार आरोपींना पोलिसांनी दोन लाख वीस हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरंबद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेवासा खुर्द येथील नाईकवाडी मोहल्ला येथील औरंगजेब रबाजी शेख (वय 28, धंदा जनरेटर दुकान) यांचे दुकानातून अनोळखी आरोपींनी पारस कंपनीचे डिझेल इंजिन असलेले हिरव्या रंगाचे 20,000 रुपये किंमतीचे दोन जनरेटर चोरून नेले होते. याप्रकरणी शेख यांनी दि. 4 जानेवारी 2023 रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यावरून नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 18/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर पोलीस निरिक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक दिनकर मुंडे, सहायक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, मच्छिंद्र बर्डे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांचे पथक नेमून सुचना देऊन पथकास रवाना केले.
पथकाकडून नेवासा परिसरात पेट्रोलिंग करताना व गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेताना पोलीस निरिक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम चोरी केलेले जनरेटर दत्तनगर रोड, श्रीरामपूर येथील सुतगिरणी जवळील बबलु शहा यांच्या स्क्रॅप सेंटर (भंगाराचे दुकानात) विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने श्री. कटके यांनी तसे पथकास कळवून नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
पथकाने पंच व इतर साधने सोबत घेऊन बेलापूर मार्गे, श्रीरामपूर ते दत्तनगर रोडने जावून सुतगिरणी, रेल्वे फाटकाजवळ सापळा लावला. त्यावेळी काळ्या रंगाची ताडपत्री असलेला एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो न्यू मदार स्क्रॅप सेंटरमध्ये जाताना दिसला. पथकातील अंमलदार यांनी दुकानाचे आडोशाला थांबुन खात्री करता चार-पाच इसम टेम्पोमधील जनरेटर खाली उतरवून ठेवताना दिसले. त्यांच्यावर अचानक छापा टाकुन ताब्यात घेत असताना टेम्पोजवळ उभा असलेला एक इसम रेल्वे पटरीचे कडेने पळू लागला. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. परंतु तो पसार होण्यास यशस्वी झाला.
यावेळी ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी नाजीम अन्वर पठाण (वय 22), आकाश चंपालाल गायकवाड (वय 20), भारत गोकुळ गांगुर्डे (वय 19) व आदित्य मनोज भवार (वय 20, सर्व रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह नेवासा येथील जनरेटर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2,00,000 रुपये किंमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व 20,000 रुपये किंमतीचे दोन जनरेटर असा एकुण 2,20,000 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे नगर जिल्ह्यात कोठे व किती ठिकाणी चोरी केली याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 19/2023 भादंवि कलम 379, राहुरी गुरनं. 22/2023 भादंवि कल 379, आश्वी गुरनं. 1/2023 भादंवि कलम 379 व नेवासा गुरनं. 18/2023 भादंवि कलम 379 या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याची जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करुन खात्री केली असता एकुण चार गुन्हे उघडकिस आल्याने सर्व आरोपींना नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील कारवाई नेवासा पोलीस करीत आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.