श्रीरामपुरात शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन,धमकीही दिली

राजकीय पदाधिकार्‍याविरुद्ध गुन्हा, ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी हात झटकले
श्रीरामपुरात शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन,धमकीही दिली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अल्पवयीन शाळकरी मुलीला क्लास सुटल्यानंतर मोटारसायकलवर शहराजवळील काटवनात नेत तिला मारहाण, शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा क्लास सुटल्यानंतर आरोपी प्रमोद आनंद शिंदे (रा. कांदा मार्केट, श्रीरामपूर) याने आपल्या मोटारसायकलवर बसवून तिला शहराजवळील काटवनात घेऊन गेला. तेथे तो पीडितेशी जबरदस्ती करू लागला तेव्हा पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तू जवळ ये नाहीतर मी तुला सोडणार नाही, असे म्हणाला. त्यावेळी पीडित तरूणी त्याच्या तावडीतून पळाली. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील काचेने स्वतःचा गळा कापून घेण्याची धमकी दिल्याने पीडित तरूणी त्याच्याजवळ गेली. त्यानंतर आरोपीने मुलीला पुन्हा क्लासजवळ सोडून दिले.

तीन-चार दिवस आरोपी पीडितेला फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्या भावाला, वडीलांना सांगण्याची धमकी देवून तुझी बदनामी करेल, असे म्हणून पुन्हा काटवनात नेले व तेथे तिचा विनयभंग केला. त्यानंतर दि. 23 डिसेंबर रोजी आरोपी प्रमोद शिंदे याने पीडितेचा व त्याचा अर्धवट फोटो पीडित मुलीच्या भावाच्या स्नॅपचॅट अकाऊंटवर शेअर केला. पीडित मुलीच्या भावाने याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

याप्रकरणी पीडित तरूणीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून प्रमोद आनंद शिंदे याच्याविरूद्ध भादंवि कलम 354, 354अ, 354ड, 323, 504, 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इस्पेक्टर समाधान सुरवाडे हे करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी युवासेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख शुभम वाघ यांनी संबंधित तरूण आपल्या पक्षात कोणत्याही पदावर कार्यरत नाही तसे कोणतेही नियुक्ती पत्र संबंधित तरूणाला देण्यात आलेले नाही,असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही गुन्हेगारांची पाठराखण न करता त्यांना कडक शासन व्हावे याकरिता आपण लवकरच पोलीस निरीक्षकांना निवेदन देणार असून यापुढे महिला व युवतींची छेड काढणार्‍यांना शिवसैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे. दरम्यान, वाघ यांच्या निवडीचे पोस्टर शहरात विविध ठिकाणी लागलेले आहेत. त्यावर हा आरोपी नाव, पद आणि फोटोसह झळकलेला आहे. हा गुन्हा दाखल होताच हे बोर्ड शहरातून गायब झाल्याचे दिसले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com