श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची 174 प्रकरणे पात्र

करोनात पती मयत झालेल्या 14 विधवा महिलांची प्रकरणे मंजूर
श्रीरामपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची 174 प्रकरणे पात्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्राच्या व राज्याच्या विशेष सहाय्य योजनेतील पाच योजनांची एकूण 231 प्रकरणे छाननी करून समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी 174 प्रकरणे पात्र व 57 प्रकरणे अपात्र करणेबाबत समितीने निर्णय दिला. सदर बैठकीत करोना महामारीमध्ये पती मयत झालेल्या एकूण 14 विधवा महिलांची प्रकरणे प्राधान्यक्रमाने मंजूर करण्यात आली.

श्रीरामपूर तालुक्याची संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथील सभागृहात आ. लहु कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सदस्य सचिव तथा तहसीलदार प्रशांत पाटील, शासकीय सदस्य तथा गटविकास अधिकारी व अशासकीय सदस्य सुधाकर अडागळे, आशा परदेशी, निखील पवार, पन्नालाल कुमावत, राजेंद्र औताडे, पवन ढाबी, रफिक शेख राजेंद्र वाकचौरे, नायब तहसीलदार संजय गांधी योजना व श्रीमती आर. जी. वाघमारे बैठकीसाठी उपस्थित होते.

या सभेत लहू कानडे यांनी तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर विशेष सहाय्य योजनेच्या एकूण 5 योजनांचे निकष व अर्जासोबत जोडण्यात येणारे कागदपत्रे याबाबत फलक तयार करून लावण्यात यावे जेणेकरून नागरिकांना या योजनांची माहिती होऊन अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडून पात्र लाभार्थ्यांनी संजय गांधी योजनेचे अर्ज गावातील तलाठी यांचेकडे जमा करतील आणि तलाठी तपासून पात्र लाभार्थी यांचे अर्ज तात्काळ तहसील कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी सादर करतील जेणेकरून कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना दिल्या.

तालुक्यातील सर्व नागरिकांना संजय गांधी योजनेचा अर्ज भरण्याकरिता अवैधरित्या पैसे उकळणार्‍या दलालांपासून दूर राहणेबाबत आवाहन केले. तसेच असे दलाल त्रास देत असतील तर त्याबाबत तक्रार सदस्य तहसीलदार श्रीरामपूर किंवा नायब तहसीलदार संजय गांधी योजना यांचेकडे करावी, अशी सूचना देण्यात आली.

सर्व संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जे पात्र लाभार्थी वंचित आहेत त्यांच्या घरी भेटी देऊन त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज भरून कार्यालयात सादर करावे. अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com