RTO कार्यालयांचा अजब कारभार, एकाच ट्रॅक्टरला दोन नंबर

भोकर येथील शेतकरी एक वर्षापासून शोधतोय दुसरा ट्रॅक्टर
RTO कार्यालयांचा अजब कारभार, एकाच ट्रॅक्टरला दोन नंबर

भोकर (वार्ताहर)

आरटीओ कार्यालयाचे अनेक किस्से ऐकले असतील पण आता पुन्हा नव्याने आरटीओ कार्यालयाचा अजब कारभार समोर आला आहे. भोकर येथील एका अल्पभुधारक शेतकर्‍याने गेल्या वर्षी छोट्या शेतीसाठी छोटा ट्रॅक्टर खरेदी केला अन्....

या शेतकर्‍यास त्या टॅक्टरची नोंदणी झाल्यानंतर चक्क वेगवेगळ्या दोन आरटीओ कार्यालयाच्या दोन वेगळ्या नंबरच्या नंबरप्लेट पोहच झाल्याने हा शेतकरी गोंधळात पडला आहे. गेल्या वर्षापासून तो शेतकरी आपल्या नावाने रजिस्ट्रेशन असलेला दुसर्‍या ट्रॅक्टरच्या शोधात असून अद्यापपर्यंत हा ट्रॅक्टर मिळाला नसल्याने ‘तो दुसरा टॅ्रक्टर कुठ आहे? असा प्रश्‍न शेतकर्‍यास पडला आहे.

भोकर शिवारातील भोकर-खानापूर रोडलगत वस्ती करून राहत असलेले अल्पभुधारक शेतकरी बाळासाहेब किसन शिंदे यांनी आपला मुलगा शशीकांत बाळासाहेब शिंदे याचे नावाने श्रीरामपूर येथे एक कुबोटा कंपनीचा 21 एचपीचा ट्रॅक्टर खरेदी केला. काही दिवसानंतर त्यांना एम एच 17 सी एम 8399 या नंबरच्या दोन नंबरप्लेट (एक मागील बाजूची व दुसरी पुढील बाजूची) घर पोहच झाल्या. त्या शेतकर्‍याने शेतात काम करणारा ट्रॅक्टर मातीने भरलेला होता म्हणून त्या नंबरप्लेट घरात ठेवल्या अन् काही दिवसांनी पुन्हा शशीकांत शिंदे नावाने एम एच 16 सी व्ही 6225 असा नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट शिंदे यांचे घरी पोहचल्या, त्यामुळे पुर्ण कुटूंबचं गांगरलं.

आपण एकच ट्रॅक्टर घेतला पण दोन वेगवेगळे नंबर असलेल्या नंबर प्लेट कशा आल्या? असा प्रश्‍न पडला. त्यांनी संबधितांशी संपर्क केला असता एक नंबर प्लेट आम्हाला पोहच करा असा सल्ला शिंदे यांना देण्यात आला; पण बाळासाहेब शिंदे यांनी दोन्ही नंबर प्लेट जवळ ठेवून त्या दुसर्‍या नंबरच्या ट्रॅक्टरचा शोध सुरू केला.

त्या नंतर काहींनी मोबाईल अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन पाहणी केली तर शशीकांत शिंदे यांचे नावाने दि. 16 ऑगष्ट 2021 रोजी एम एच 16 सीव्ही 6225 या क्रमांकाचा कुबोटा कंपनीच्या टॅ्रॅक्टरची नोंदणी अहमदनगर आरटीओ कार्यालयात  झालेली आढळली तर दि. 26 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच शशीकांत शिंदे नावाने एम एच 17 सीएम 8399 या क्रमांकानुसार कुबोटा ट्रॅक्टरची नोंदणी आहे. त्यात शशीकांत शिंदे यांनी ट्रॅक्टर खरेदी करताना एका फायनान्स कंपनीकडून फायनान्स घेतल्याची नोंदणी आहे.

तर दुसर्‍या टॅक्टरच्या नोंदणीवर फायनान्स कंपनीचा उल्लेख नसल्याने आता खरी नोंदणी कोणती? जर दोन्ही नोंदणी खर्‍या आहेत तर मग शिंदे यांचा दुसरा ट्रॅक्टर कुठ आहे? याचा शोध शिंदे परिवार गेल्या वर्षापासून घेत आहे.त्यात आपल्या ट्रॅक्टरला आत कोणती नंबर प्लेट बसवायची असा प्रश्‍न असल्याने त्यांनी अद्यापर्यंत त्या दोन्ही नंबरच्या नंबर प्लेट घरातच ठेवून ट्रॅक्टर वापरताना दिसत आहेत.

शिवाय जर दोन्ही आरटीओ कार्यालयातील नोंदणी योग्यच असेल तर मग तो दुसरा ट्रॅक्टर कुठयं? शिवाय त्या दुसर्‍या ट्रॅक्टरचा कुठे गैरवापर झाला किंवा एखादा अपघात किंवा काही अनुचीत घडल्यास त्यास जबाबदार कोण? असे अनेक प्रश्‍न उपस्थीत होत आहेत.

ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करुनही आरटीओ कार्यालयातून या दोन्ही नोंदणी झाल्या कशा? संबधीत आरटीओ कार्यालयातील संबधीत अधिकारी यांनी नोंदणी करताना समक्ष पाहणी करून नोंदणी केलेल्या दोन्ही ट्रॅक्टर पैकी दुसरा ट्रॅक्टर कुठं आहे? याचा शोध घेवून त्या अल्पभुधारक शेतकर्‍यास त्याचे नावावर नोंदणी असलेला दुसरा ट्रॅक्टर शोधून द्यावा, अशी माफक अपेक्षा संबधीत शेतकरी करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com