आरटीओ कार्यालयात व्यवसाय कराची लूट

सुधारणा न झाल्यास आंदोलन - मुथा
आरटीओ कार्यालयात व्यवसाय कराची लूट

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दलाल आणि अधिकारी यांचेकडून संगनमताने व्यवसाय कराच्या सरकारी रकमेची राजरोस लूट केली जात असून त्यात सुधारणा झाली नाही तर वाहनधारकांचे आंदोलन अथवा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी दिला आहे.

यासंदर्भात श्री. मुथा यांनी सांगितले की, वाहन परवान्यासाठी व्यवसाय कर भरून त्याची पावती सादर केल्यावर आरटीओ कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये पावती सादर केल्यावर या पावतीवर क्रमांक नसल्याने ती ग्राह्य नसल्याचे सांगून परवाना नाकारला जातो. वाहनधारकाने संबंधित दलालाकडे रोख रक्कम भरून पावती घेतल्यानंतर हा प्रकार घडतो. तसेच वाहनधारकाकडे व्यवसाय कराची मागील बाकी असल्याचेही सांगण्यात येते.

संबंधित वाहन धारकाकडे व्यवसाय कराची मागील बाकी असेल तर मग त्या वाहन धारकाला परवाना कसा दिला जातो, तसेच याबाबतची माहिती विचारल्यावर आमचेकडे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले जाते. रेकॉर्ड उपलब्ध नाही तर मग मागील व्यवसाय कराची मागणी कोणत्या आधाराने केली जाते, असा सवाल श्री. मुथा यांनी उपस्थित केला.

व्यवसाय कर भरून त्याची रितसर पावती घेतल्यावरही सदर पावतीवर नंबर नाही, असे सांगून परवाना नाकारला जातो. तर भरलेलेली रक्कम जाते कुठे, हा प्रश्न आहे. याचाच अर्थ अधिकारी आणि दलालांचे रॅकेटमार्फत पध्दतशीरपणे व्यवसायकराच्या सरकारी रकमेची लूट केली जाते हे उघड होते, असा आरोप करून यात सुधारणा करावी, अन्यथा वाहनधारकांचे आंदोलन अथवा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा श्री. मुथा यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com