श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका लॉटरी व्यावसायिकाच्या बंगल्यात प्रवेश मिळविला. मात्र कोणीतरी उठल्याचा आवाज आल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

पुढे एका रखवालदाराच्या घरात घुसून तेथे असलेल्या महिलेस चाकूने वार करून तिला जबर जखमी केले. त्या ठिकाणाहून 11 हजार रुपये रोख रक्कम तसेच गळ्यातीले सोन्याचे गंठण घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास उत्सव मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस राहत असलेल्या सागर भागवत यांच्या बंगल्याच्या पाठीमागील भिंतीची जाळी तोडून बंगल्याच्या परिसरात प्रवेश मिळविला. बंगल्याच्या दक्षिण बाजुस असलेल्या दरवाजाची कडी कटावणीच्या सहाय्याने तोडून बंगल्यात प्रवेश मिळविला.

वरच्या खोलीत जात असताना त्यांना कोणीतरी उठल्याचा आवाज आल्याने दरोडेखोरांनी आल्या पावली पुन्हा धूम ठोकली. पाठिमागील बाजुस पडीक जमिनी असल्यामुळे अंधारात ते चोरटे कुठे गेले ते कळाले नाही. भागवत यांच्या बंगल्यातून कोणीतरी चोरट्यांच्या तावडीत सापडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

या बंगल्यातील दरोड्याचा प्रयत्न फसल्याने खवळलेल्या चोरट्यांनी डावखर यांच्या मळ्यात राहत असलेले रखवालदारी करणारे मंजित दुद्देल सुनार यांचे घर असून त्या ठिकाणी दरोेडेखोरांनी आपला मोर्चा वळविला. त्या घरात सुनार हे रखवालीसाठी गेलेले असल्याने त्यांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक लोकबहादुर प्रजित सुनार, कुणंती लोकबहादुर सुनार (रा. जयराम कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव) काल शहरात आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर मंजित हा कामासाठी घराबाहेर पडला आणि लोकबहादुर आपल्या पत्नी समवेत घरी झोपलेले होते.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंजित यांच्या घराचा दरवाजा लाथा मारुन हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. आवाज आल्यानंतर लोकबहादुर जागा झाला. परंतु चोरट्यांनी त्याला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच कुंणती यांच्या डोक्यात रॉड मारुन हातावर चाकुने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. चोरट्यांनी लोकबहादुर यांच्या पाकिटातील 11 हजार रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील नऊ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण घेऊन धुम ठोकली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जखमी कुणती यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस अधीक्षक समाधान सुरवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या दरम्यान श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाने बराच लांबपर्यंत महाले पोद्दार शाळेपर्यंत जावून माग काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पहाटेच पोलीस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच तीन ते चार ठिकाणचे सीसीटीव्हीज फुटेज तपासले असता काही चेहरे दिसून आले. पोलीस या चेहर्यांचा शोध घेत आहेत.