काय तो रस्ता, काय तो चिखल, काय ते खड्डे, सगळं...

प्रभाग पाच मधील रस्त्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष
काय तो रस्ता, काय तो चिखल, काय ते खड्डे, सगळं...

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळातील रस्ते डांबरीकरण, खडीकरण तसेच सिमेंटचे करण्यात आले. सर्वत्र रस्ते तयार झाले, परंतु प्रभाग 5 मधील रस्त्याचे काम अद्याप झाले नाही. या रस्त्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असून संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तातडीने काम करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

या भागातील नागरिक दोन वर्षांपासून रस्त्याच्या कामाची मागणी करीत आहेत. या कामासंदर्भात चौकशी केली असता, काम प्रक्रियेत आहे, लवकर होईल, प्रस्ताव सादर केला नाही, निधी अजून आला नाही, निधी आला की काम होईल, अशी उत्तरे मिळतात. संपूर्ण शहरासातील अनेक ठिकाणी कामासाठी कोट्यावधी निधी आला. मात्र या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नसावा अथवा या कामाकडे दुर्लक्ष होत असावे, मरंतू फक्त आश्वासने मिळत असून रस्त्याच्या कामासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते, हे या भागातील नागरिकांचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया येथील जेष्ठ नागरिक व पत्रकार बी आर चेडे यांनी केली.

ज्येष्ठ नागरिक चेडे यांच्या घरासमोरील रस्त्यात पावसाचे अथवा अन्य कारणांनी पाणी साचून पाण्याचे तळे होते. चेडे यांनी त्याचे फोटो काढून नगराध्यक्षा, नगरसेवक यांना पाठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. त्यास दोन वर्षे होत आली, परंतु काम झाले नाही. माजी नगराध्यक्षा यांनी सूचना देऊन रस्त्याच्या कामासाठी मंजुरी दिली. नगरसेवकांनीही अनेकदा फोन नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, अभियंता यांना प्रभाग 5 मध्ये जाऊन पाहणी करण्यास सांगितले. परंतु दोन वर्षांत अधिकारी अथवा अभियंता येथे फिरकलेच नाही. त्यांना इतर प्रभागात जायला वेळ मिळाला, मात्र येथे येण्यास वेळ नाही. याआधी कोणत्याही समस्या मांडल्यास महिन्याच्या आत सोडविल्या जात. दीड दोन वर्षाचा काळ उलटूनही काम होत नाही.

या रस्त्यावरून जाताना लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आता रस्ता आहे तसाच बरा, आम्ही पाण्यातून, चिखलातून पूर्वीप्रमाणेच जाऊ, कोणाला काळजी वाटल्यास संबंधिताना पाठवून पाहणी करतील, अशी या भागातील नागरिकांची मानसिकता झाली आहे. आता तर पावसाळ्याचे निमित्त आहे. त्यामुळे काय तो रस्ता, काय तो चिखल, असे म्हणत सध्या डोक्याला हात लावायची वेळ आली असल्याचे श्री. चेडे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com