श्रीरामपुरात ‘रॅपीड टेस्ट’ला नगरसेवकांचा आक्षेप !

वॉर्ड नंबर दोन मध्ये पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य मिळत नसल्याचीही तक्रार
श्रीरामपुरात ‘रॅपीड टेस्ट’ला नगरसेवकांचा आक्षेप !

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील वॉर्ड नंबर दोन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर महसूल, वैद्यकीय व पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने लोकांशी वागत आहे त्याबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून प्रशासनाला सहकार्य करण्याची लोकांची भूमिका असताना पोलीस मात्र त्रास देण्याच्या हेतूने काम करीत आहेत. त्यामुळे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करीत असताना प्रशासन मात्र सहकार्य करीत नसल्याची नाराजी वॉर्ड नंबर 2 मधील नगरसेवकांनी व्यक्त केली.

वॉर्ड नं. 2 मधील नगर पालिका शाळा क्रमांक पाचमध्ये होमिओपॅथिक फोरमच्यावतीने औषध वाटप शिबिर पार पडले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी वॉर्ड नंबर 2 मध्ये आरोग्य यंत्रणेमार्फत गेल्या चार दिवसांपासून केल्या जाणार्‍या उपाय योजनांची माहिती दिली. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम रुग्णांची रॅपीड चाचणी या भागामध्ये करण्यात आली असून आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी रॅपीड टेस्ट ही पूर्णत: विश्वासपात्र नाही. राजस्थान सरकारने त्यावर बंदी घातली आहे. असे असताना जोपर्यंत दुसर्‍या चाचणीचा अहवाल येत नाही तोपर्यंत एखाद्या रुग्णाला कोव्हिड-19 म्हणून घोषित करणे योग्य नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली आहे.

अशा रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले पाहिजे. दुसर्‍या चाचणीत रुग्ण बाधित आढळला तर त्याला कोव्हिड सेंटरमध्ये नेण्यास आमची हरकत नाही, असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातून आणीबाणीच्याप्रसंगी एक रस्ता चालू ठेवण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन त्याला प्रतिसाद देत नाही, असा ठपका ठेवला. लोकांना गॅस टाक्या खांद्यावर उचलून बरेच लांब जावे लागत आहे. त्यामुळे एक रस्ता चालू ठेवून तेथे पोलीस बंदोबस्त द्यावा. गरजुंना तेथून सोडण्यात यावे, अशी मागणी केली.

नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी शहराच्या दुसर्‍या भागांमध्ये सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र असताना त्या भागामध्ये अशा प्रकारची चाचणी होत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगून सर्वच लोकांची चाचणी करण्यास आमची हरकत नाही. मात्र त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे.

प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन देखील एक रस्ता सुरू केलेला नाही. त्याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस जनतेला सहकार्य करीत नाही. लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विनाकारण वॉर्ड नंबर 2 बदनाम करू नका, असेही त्यांनी आरोग्य अधिकारी व पोलिसांना सुनावले.

यावेळी नगरसेवक मुक्तार शहा, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, अल्तमश पटेल, अ‍ॅड. समीन बागवान, सलीमखान पठाण, तोफिक शेख, सोहेल बारूदवाला, जावेद शेख आदी उपस्थित होते.

अफवा पसरविणार्‍यांविरुध्द कारवाई करणार

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला इशारा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांच्या हालचालींना प्रतिबंध करणे, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना अर्सेनिक अल्बमसारख्या औषधींचे वाटप करणे, आपला जीव धोक्यात घालून आशा व आरोग्य सेविकांमार्फत घरोघरी जात करोना लक्षणांची तपासणी करणे, संशयित व्यक्तींचे स्त्राव घेणे इत्यादींचा समावेश आहे.

स्त्रावाचे अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने शासनाकडून रॅपीड टेस्टचे 150 किट उपलब्ध झाले आहेत. वॉर्ड क्र.2 मधील शाळा क्र. 4 व 5 मध्ये 60 व्यक्तींपैकी 4 व्यक्ती पॉझिटिव्ह येणे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे,असे असताना व गेले काही दिवस बर्‍याच प्रमुख व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना अचानक याठिकाणी काहींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाला रॅपिड टेस्ट करण्यास विरोध करून टेस्टबाबत संभ्रम निर्माण होईल अशा स्वरूपाच्या अफवा पसरवत आहेत.

या अफवांमुळे नागरिक रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी येत नाहीत. सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. वैद्यकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या साथरोग नियंत्रणाच्या प्रयत्नात अडथळा आणणार्‍या, समाजात अफवा पसरवणार्‍या प्रवृत्तींना या आवाहनाच्या माध्यमातून सक्त कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असून यात अनुचित प्रकारे अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com