
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मागील दोन वर्षांत करोनामुळे साजरी न झालेली रमजान ईद काल शहर व तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ईदगाह मैदान व जामा मशीद तसेच शहरातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद व अक्षय तृतियेच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छांचा पाऊस पडला.
जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची नेतेमंडळी उपस्थित होती. ईदगाहमध्ये आ. लहू कानडे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख व पत्रकार मनोज आगे यांच्यातील राजकीय शेरेबाजी चांगली गाजली.
जामा मशीद व ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आ. लहू कानडे तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते सर्वश्री माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अविनाश आदिक, करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, हेमंत ओगले, संजय फंड, राजाभाऊ कापसे, संजय छल्लारे, अशोक बागूल, महेंद्र त्रिभुवन, लकी सेठी, दिलीप नागरे, अशोक कानडे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, दीपक कदम, आदित्य आदिक, विजय खाजेकर, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप आदींसह मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
आगामी नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक पाहता यावर्षी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये शुभेच्छा फलकांची स्पर्धा दिसून आली. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या. पोलीस खात्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ईदगाह मैदानाला कंपाउंड करणार - आ.कानडे
ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव सार्वजनिक नमाज पठण करतात. त्या ईदगाह मैदानावर काही व्यसनाधीन मंडळींकडून पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे शहराचे काझी मौलाना अकबर व इतर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आ. लहू कानडे यांच्याकडे सदर मैदानाला सुरक्षेसाठी कंपाउंड बांधून देण्याची मागणी केली. आपल्या शुभेच्छापर भाषणात ईदगाह मैदानावर कंपाउंड करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे आ. कानडे यांनी जाहीर केले. महिना-दीड महिन्यात सदरचे काम सुरू करण्यात येईल,अशी ग्वाही यावेळी आ. कानडे यांनी दिली.
सार्वमतचा गौरव
दैनिक सार्वमतच्या रमजानुल मुबारक या लेखमालेने यावर्षी रौप्य महोत्सव साजरा केला. सलग पंचवीस वर्ष सार्वमतच्या माध्यमातून रमजानुल मुबारक या लेखमालेद्वारे सर्वधर्मीय वाचकांसाठी इस्लाम धर्मा बद्दलची धार्मिक, सामाजिक माहिती देऊन जातीय व धार्मिक सलोखा तसेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण केल्याबद्दल मालिकेचे लेखक सलीमखान पठाण यांचा मुस्लिम समाज व जामा मस्जिद ट्रस्टच्यावतीने आ. कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सार्वमतचे वृत्त संपादक अशोक गाडेकर यांचाही मुस्लिम समाजाच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.