अनधिकृत कामे पाडल्यामुळे विरोधकांचा उठला पोटशूळ : राजेंद्र पवार
सार्वमत

अनधिकृत कामे पाडल्यामुळे विरोधकांचा उठला पोटशूळ : राजेंद्र पवार

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषदेत सत्तांतर केल्यानंतर पालिकेमध्ये निःस्वार्थ भावनेने लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी कुठल्याही राजकीय गटांचा विचार न करता विकास कामे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केली आहेत. विरोधकांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करून शासकीय नियमांची पायमल्ली केली. ही कोट्यवधी रुपयांची कामे त्यांना पाडावी लागली. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला असल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केला.

पालिकेच्या गोंधवणी येथील तलावातून पाणीपुरवठा होतो मात्र त्या साठवण तलावाच्या वरचा कागद, फरशा निकृष्ट केलेल्या कामामुळे निघालेल्या आहेत. याबाबत विरोधक गप्प का आहेत? त्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. तसेच जेव्हा साठवण तलावाचे कोट्यवधी रुपयांचे काम सुरू होते.

तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काम मंजूर होते मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी सवय लागलेल्या तत्कालीन सत्ताधार्‍यांनी तेव्हाच सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पाण्याचे आवर्तन उशिरा आल्यामुळे जुन्या तलावातील पाणी सर्व प्रक्रिया करून वापरले. शहराला करत असलेल्या पाणीपुरवठा तपासूनच करावा लागतो हे विरोधकांना कदाचित माहीत नसावे. उपनगराध्यक्ष व त्याच्या नगरसेवकांची बौद्धिक व राजकीय क्षमता कमी असल्याचे यावरून दिसून येते.रोज पाण्याचा अहवाल घेतला जातो ते पिण्यासाठी योग्य असेल तरच पाणी सोडावे लागते.

ज्यांनी त्यांच्या काळात गावाला मैलामिश्रित पाणी पाजले त्या ससाणेंनी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद आहे, ज्यांनी भुयारी गटार योजनामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला त्यांना जामिनासाठी दारोदार भटकावे लागत आहे. त्यांनी 25 वर्षांत काय दिवे लावलेत ते सर्वसामान्य जनतेला चांगले माहिती आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

शहरात पाण्याचे नियोजन दिवंगत गोविंदराव आदिक ज.य. टेकावडे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. त्यांचे फुकटचे श्रेय आपल्या कुटुंबाला उपनगराध्यक्ष यांनी घेऊ नये. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. तेव्हा उपनगराध्यक्षांनी येथून पुढच्या काळात आपली क्षमता पाहून बोलावे असा टोला नगरसेवक राजेंद्र पवार यांनी लगावला आहे .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com